टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने रंगतदार वळणावर आले आहेत. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ सुपर 8 फेरीतील एका गटात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपला पहिला सामना जिंकत पुढे कूच केली आहे. भारताने अफगाणिस्तानला, तर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत केलं आहे. आता 22 जूनला भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना होत आहे. हा सामना दोन्ही देशांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट आणि बांगलादेशचं स्पर्धेतील अस्तित्व या सामन्यावर टिकून आहे. असं असताना भारतीय क्रीडारसिकांना भारतच जिंकेल असं वाटत आहे. पण बांग्लादेशने यापूर्वी स्पर्धेत अनेक उलटफेर केले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला गाफील राहून चालणार नाही. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.
भारत बांग्लादेश सामन्यापूर्वी हा व्हिडीओ शेअर केल्याने पुन्हा एकदा जखम ओली झाली आहे. कारण 2004 साली झालेल्या सामन्यात बांग्लादेशने भारताला पराभूत केलं होतं. नेमका हाच व्हिडीओ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. 2004 साली वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. बांगलादेशने 50 षटकात 9 गडी गमवून 229 धावा केल्या आणि विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारताला 214 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशने 15 धावांनी विजय मिळवला.
From the Archives: First-ever international match victory against India at Bangabandhu National Stadium, Dhaka in 2004#BCB #Cricket #Bangladesh #CricketMemories pic.twitter.com/8qifqP4c3V
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 21, 2024
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुपर 8 फेरीआधीच हा व्हिडीओ शेअर केल्याने भारतीय चाहते संतापले आहेत. कारण हा सामना 26 डिसेंबर 2004 रोजी झाला होता. त्यामुळे आता शेअर करण्याचं कारण काही कळलं नाही. 22 जूनला भारत बांग्लादेश महत्त्वाचा सामना होणार आहे. या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आता 22 जूनच्या सामन्यात कोण कोणावर भारी पडतं? हे कळेल. तत्पूर्वी या व्हिडीओखाली दोन्ही देशांचे चाहते भिडले आहेत.