AUS vs IND : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाची ‘यशस्वी’ सुरुवात, ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा

| Updated on: Nov 25, 2024 | 1:56 PM

Australia vs India 1st Test Match Result : टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. भारत पर्थमधील ओपट्स स्टेडियममध्ये विजय मिळवणारा पहिला परदेशी संघ ठरला आहे.

AUS vs IND : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाची यशस्वी सुरुवात, ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा
team india perth
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी (25 नोव्हेंबर) 295 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 58.4 ओव्हरमध्ये 238 धावांवर गुंडाळला. यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ओप्टस स्टेडियममध्ये विजय मिळवणारा हा पहिलाच परदेशी संघ ठरला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

सामन्याचा धावता आढावा

रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत कॅप्टन जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. पहिला डाव 150 धावांवर आटोपला. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली. कांगारुंना पहिल्या डावात 104 धावांवर गुंडाळलं. जसप्रीत बुमराह याने 5 विकेट्स घेतल्या. डेब्यूटंट हर्षित राणा याने 3 तर मोहम्मद सिराज याने 2 विकेट्स मिळवल्या.

भारताचा दुसरा डाव, सलामी द्विशतकी भागीदारी

त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुनरागमन केलं. टॉप 4 मधील देवदत्त पडीक्कल याचा अपवाद वगळता इतर 3 फलंदाजांनी धमाका केला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी द्विशतकी सलामी भागीदारी केली. केएल राहुल आऊट होताच ही भागीदारी फुटली. केएलने 77 धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल 25 धावा करुन माघारी परतला. यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 161 धावा केल्या.

ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर 29 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी अखेरीस फटकेबाजी केली. विराट कोहली याने चौकारासह शतक ठोकलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं शतक ठरलं. विराटच्या या शतकासह कॅप्टन बुमराहने 134.3 षटकांमध्ये 6 बाद 487 धावांवर दुसरा डाव घोषित केला. तर 46 धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं महाकाय आव्हान मिळालं.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला 3 झटके दिले. नॅथन मॅकस्वीनी झिरोवर आऊट झाला.कॅप्टन पॅट कमिन्स 2 आणि मार्नस लबुशेन 3 धावांवर बाद झाले. मार्नस आऊट होताच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या खेळाला 3 बाद 12 धावांपासून सुरुवात केली.

उस्मान ख्वाजा 4 आणि स्टीव्हन स्मिथ 17 धावांवर बाद झाले. त्यानंतर ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडला फार वेळ टिकता आलं नाही. हेडने ऑस्ट्रेलियासाठी 101 बॉलमध्ये 89 धावा केल्या. मितेल मार्श याने 47 आणि मिचेल स्टार्कने 12 धावा केल्या. नॅथन लायन आला तसाच झिरोवर परतला. हर्षित राणा याने अॅलेक्स कॅरी याला 26 धावांवर बोल्ड केलं. यासह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला आणि भारताने सामना जिंकला.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा विजय


टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर याने दोघांना बाद केलं. तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोन्ही डेब्यूटंट्सने प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.