टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 6 डिसेंबरपासून एडलेड येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया गेल्या वेळेस ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेडमध्ये 36 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा सामना हा आव्हानात्मक असणार आहे. इतकंच नाही तर टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2025 च्या हिशोबाने या मालिकेतील प्रत्येक सामना हा निर्णायक असा आहे. त्यामुळे विजयी घोडदौड सुरु ठेवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा मार्ग आणखी सुकर करण्याच्या प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे 11 जून 2025 पासून खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाला दुहेरी झटका दिला. ऑस्ट्रेलियाचे पराभवासह पॉइंट्स कमी झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 पॉइंट्स टेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आणि कांगारुंना दणका दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया तिसर्या स्थानी फेकली गेली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला अजून 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी आहे. मात्र 2 जागांसाठी आतापासूनच जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या शर्यतीत एकूण 5 संघ आहेत, मात्र त्यापैकी एका टीमचं पॅकअप झाल्यात जमा आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे 4 संघ मुख्य शर्यतीत आहेत. तर न्यूझीलंडचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. इंग्लंड, विंडिज, पाकिस्तान आणि बांगलादेश अधिकृतरित्या बाहेर झाले आहेत. मात्र इंग्लंड आणि पाकिस्तान इतर संघांचं समीकरण बिघडवू शकतात. इंग्लंडने न्यूझीलंडला पहिल्या कसोटीत पराभूत केलं आणि त्यांचं समीकरण बिघडवलं. तसेच पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावला तरी अडचणी वाढतील.
टीम इंडियाला स्वबळावर अंतिम सामन्यात पोहचायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5-0, 4-1, 4-0, 3-0 अशा फरकाने मालिका जिंकावी लागेल. असं झालं तर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचेल आणि ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट होईल.
भारताने कसोटी मलिका 3-1 ने जिंकली तरीही शक्यता आहे. मात्र अशात टीम इंडियाला दुसऱ्यांच्या भरोशावर रहावं लागेल. श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभव न व्हावा, अशी प्रार्थना भारताला करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेने दुसरा कसोटी सामना जिंकला तर टीम इंडिया 3-1 ने मालिका जिंकूनही या अंतिम फेरीच्या स्पर्धेतून बाहेर होईल.श्रीलंका-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतरही टीम इंडिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
भारताने कसोटी मालिका 3-2 ने जिंकल्यास परिस्थिती अवघड होईल. टीम इंडियाला अशा परिस्थितीत श्रीलंकेकडून मदतीची अपेक्षा असणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारीपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. श्रीलंकेने ही मालिका ड्रॉ केल्यास टीम इंडियाला फायदा होईल.
बॉर्डर गावसकर ट्रॉफऱी कसोटी मालिकेचा निकाल 2-2 असा लागल्यास टीम इंडियाच्या शक्यता फार कमी होतील. त्यानंतर टीम इंडियाचं भवितव्य दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या हातात असेल. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकावी. तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका जिंकली तर टीम इंडियाची शक्यता वाढेल.