Asia Cup : आशिया कप वेळापत्रकात मोठी गडबड, टीम इंडियाला लाहोरमध्ये जावून खेळावंच लागणार

| Updated on: Jul 19, 2023 | 9:03 PM

आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु होती. दहशतवादी कारवाया पाहता भारताने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आलं, पण झालं असं की..

Asia Cup : आशिया कप वेळापत्रकात मोठी गडबड, टीम इंडियाला लाहोरमध्ये जावून खेळावंच लागणार
Asia Cup : आशिया कप वेळापत्रकात मोठा घोळ, चुकून असं झालं तर लाहोरमध्ये खेळावा लागेल सामना
Follow us on

मुंबई : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी आशिया कप स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळली जाणार आहे. म्हणजेच काही सामने पाकिस्तानात, तर काही सामने श्रीलंकेत होणार आहे. वेळापत्रक पाहिल्यानंतर पाकिस्तानला बीसीसीआयसमोर अखेर झुकावं लागलं असं चित्र आहे. वेळापत्रकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. पण वेळापत्रकातील एक चूक आता समोर आली आहे. यावरून आता जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

वेळापत्रकात काय आहे गडबड?

आशिया चषक वेळापत्रकानुसार पाकिस्तानात एकूण चार सामने होणार आहेत. आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानातील मुल्तानमध्ये होणार आहे. दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. तिसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. तर सुपर फोरमधील एक सामना पाकिस्तानातील लाहोरमध्ये खेळला जाणार आहे.

सुपर 4 मधील सामन्यावरून जोरदार घमासान आहे. कारण साखळी फेरीतील गणित चुकलं तर भारताला लाहोरमध्ये जाऊन सुपर 4 फेरीतील एक सामना खेळावा लागू शकतो. हा सामना 6 सप्टेंबर रोजी असणार आहे. त्यामुळे भारत हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जाईल का असा प्रश्न आहे.

…तर भारताला पाकिस्तानात जावं लागेल

आशिया चषकात एकूण सहा संघ असून तीन संघाचे दोन गट तयार केले आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एका गटात म्हणजेच अ गटात आहेत, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका दुसऱ्या गटात म्हणजेच ब गटात आहेत. दोन्ही गटातील टॉप दोनमध्ये असलेले संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाय करतील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तर तिसरा संघ नेपाळ आहे. त्यामुळे सुपर फोरमध्ये हे दोन संघ पोहोचतील अशीच चर्चा आहे.

अ गटात भारतीय संघ सर्व सामने जिंकत टॉपला राहिला तर मात्र ब गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी लढत असेल. पण हा सामना पाकिस्तानातील लाहोरमध्ये असणार आहे. जर भारतीय संघ अ गटात दुसऱ्या स्थानी राहिला तर मात्र श्रीलंकेत सामना खेळावा लागेल. त्यामुळे सामन्याचं गणित कसं जुळून येतं यावर सर्व काही अवलंबून आहे.

कसा स्पर्धेचा फॉर्मेट

आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेट असणार आहे. साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम फेरी असे एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत.