मुंबई : बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका न्यूझीलंडने जिंकली. सुरुवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडने आघाडी मिळवली होती. पण तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. बांगलादेशने तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 98 धावांवर तंबूत परतला. तसेच बांगलादेशसमोर विजयसाठी 99 धावांचं आव्हान मिळालं. बांगलादेशने हे आव्हान 15.1 षटकात अर्थात 91 चेंडूत 1 गडी गमवून पूर्ण केलं. बांगलादेशचा न्यूझीलंडच्या धरतीवरील हा पहिला वनडे विजय आहे. यापूर्वी बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये 18 वनडे सामने खेळले आहेत आणि त्या प्रत्येक सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
न्यूझीलंडला चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. संघाच्या 16 धावा असताना रचिन रविंद्र शोरिफुल तान्झिम हसन सकीबच्या गोलंदाजीवर बाद झाला. 8 धावांवर करून त्याला तंबूत परतावं लागलं. त्यानंतर हेन्री निकोल्सही काही खास करू शकला नाही. अवघ्या एका धावेवर असताना सकीबने त्याला माघारी धाडलं. त्यानंतर विल यंग आणि टॉम लॅथमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण शोरिफुल इस्लामने दोना बाद केलं. त्यानंतर फलंदाज खेळपट्टीवर नुसती हजेरी लावून जात होते. टॉम ब्लंडेल 4, मार्क चॅपमॅन 2, जोश क्लार्कसन 16, एडम मिल्ने 4, अदित्य अशोक 10, विल ओरॉर्के 1 धाव करून स्वस्तात बाद झाले. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने 3, तान्झिम हसन सकिबने 3, सौम्य सरकारने 3 आणि मुस्ताफिझुर रहमानने 1 गडी बाद केला.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 99 धावांचं आव्हान गाठण्यासाठी सौम्या सरकार आणि अनामुल हक जोडी मैदानात आली. पण चार धावांवर असताना सौम्या रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर अनामुळ हक आणि नजमुल होसेन शांतो यांनी विजयी भागीदारी केली. अनामुळे 37 धावा करून बाद झाला. तर शांतोने नाबाद 51 आणि लिटन दास नाबाद 1 धावांवर राहिले.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): सौम्या सरकार, अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, तंजीम हसन साकिब, रिशाद हुसैन, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, रचिन रविंद्र, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, एडम मिल्ने, आदित्य अशोक, जेकब डफी, विल्यम ओरर्के