मुंबई : रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या कर्णधारपदाची सुरुवात अप्रतिम केली आहे. आधी त्याने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा सुपडा साफ केला, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेलाही त्याने क्लीन स्वीप पराभूत केलं. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अद्याप हरलेली नाही आणि त्याच्या रणनीतीचेही सतत कौतुक होत आहे. दरम्यान, विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक (Virat Kohli’s childhood coach) राजकुमार शर्मा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) म्हणाले की, “रोहित शर्मा खूप शांत खेळाडू आहे पण कर्णधार म्हणून त्याला सोप्या मालिका मिळाल्या हेदेखील खरे आहे. राजकुमार शर्मा म्हणाले की, रोहित शर्माची खरी परीक्षा तेव्हा सुरू होईल जेव्हा टीम इंडिया एखाद्या मालिकेत पराभूत होईल.”
इंडिया न्यूजशी संवाद साधताना राजकुमार शर्मा म्हणाले, ‘”रोहित शर्मा खूप शांत दिसत आहे पण ही त्याच्या कर्णधारपदाची फक्त सुरुवात आहे. रोहित शर्मा नशीबवान आहे कारण त्याला सुरुवातीलाच सोप्या मालिका मिळाल्या. संघ हरला की आरोप-प्रत्यारोपांचे चक्र सुरू होते.” राजकुमार शर्मा म्हणाले की, “टीम इंडियाची कामगिरी अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा आहे, पण जेव्हा निकाल नकारात्मक असेल तेव्हाच प्रश्न निर्माण होतात.”
राजकुमार शर्मा म्हणाले की, “जेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक चुका करतात तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. तुमची रणनीती चुकीची होती असं सगळेजण म्हणतात. अमुक खेळाडूला तमुक नंबरवर पाठवायला हवे होते. पाच नव्हे तर चार गोलंदाज खेळवायला हवे होते, असे सल्ले दिले जातात. टीका केली जाते. अशी परिस्थिती उद्भवू नये अशी प्रार्थना करतो. टीम इंडियाने सलग सामने जिंकत राहावं आणि वर्ल्ड कपही जिंकावा.”
राजकुमार शर्मा म्हणाले, “रोहित माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मार्गावर आहे. त्याने दादाप्रमाणेच ड्रेसिंग रूमचे वातावरण तयार केले आहे. ‘रोहित प्रत्येक युवा खेळाडूसाठी ड्रेसिंग रूममध्ये चांगलं वातावरण राखतो. तुम्ही शानदार खेळाडू आहात, म्हणूनच तुम्ही टीम इंडियामध्ये आहात, असा विश्वास रोहित शर्माने तरुणांना दिला आहे. तरुण खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण असणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा ही बाब पुढे नेत आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली याची सुरुवात झाली असे मला वाटते.”
इतर बातम्या
Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब