बांग्लादेश क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत घडलेल्या एका विचित्र प्रकाराची सध्या चर्चा आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. कारण एकाच चेंडूवर दोन वेळा बाद होण्याची ही पहिलीच वेळ असावी. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात खुलना टायगर्स आणि चटगाव किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल चटगाव किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खुलाना टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. विल्यम बोसिस्टो आक्रमक खेळी केली. 50 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली. तर महिदुल इस्लाम अंकनने 22 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकार मारून नाबाद 59 धावा केल्या. खुलना टायगर्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चटगाव किंग्सचा डाव गडगडला. तसेच 166 धावांपर्यंत मजल मारू शकला.
पहिल्या 7 षटकात चटगाव किंग्सचा निम्मा संघ तंबूत होता. दोन चेंडूचा सामना करून हैदर अली बाद झाला, त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. चटगावची ही पाचवी विकेट होती. त्याची विकेट गेल्यानंतर मैदानात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. कारण दुसरा खेळाडू मैदानात येण्यासाठी सज्ज नव्हता. त्यामुळे हैदर अली मैदानातच थांबला होता. दुसरीकडे, खुलना टायगर्सचे खेळाडू वारंवार घड्याळ पाहात होते. टॉम ओ कोनेल कसा बसा तयारी करत मैदानात उतरला. पण तिथपर्यंत 3 मिनिटांचा अवधी संपला होता. त्यामुळे पंचांनी त्याला मैदानात येताच बाद घोषित केलं. त्यानंतर खुलना टायगर्सचा कर्णधार मेहदी हसन मिराज पंचांकडे गेला आणि त्याला फलंदाजीसाठी पुन्हा बोलवलं.
मेहदी हसन मिराज या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण टॉम ओ कोनेल फक्त एक चेंडूचा सामना करून बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे एकाच चेंडूवर दोन वेळा बाद होण्याची वेळ आली. यापूर्वी बांग्लादेश संघाने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूजला टाइम आउट घेतला होता. तेव्हा बराच वाद झाला होता. पण आयसीसी नियमानुसार, त्याला एकही चेंडू न खेळता बाद होत तंबूत जावं लागलं होतं.
खुलना टायगर्स (प्लेइंग इलेव्हन): विल्यम बोसिस्टो, मोहम्मद नईम, अफिफ हुसेन, महिदुल इस्लाम अंकन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ (कर्णधार), नसुम अहमद, हसन महमूद, अबू हैदर रॉनी, मोहम्मद नवाज, ओशाने थॉमस, इब्राहिम जद्रान.
चटगाव किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद मिथुन (विकेटकीपर/कर्णधार), नईम इस्लाम, उस्मान खान, हैदर अली, शमीम होसेन, परवेझ हुसैन इमॉन, टॉम ओ कोनेल, मोहम्मद वसीम ज्युनियर, शोरीफुल इस्लाम, खालेद अहमद, अलीस अल इस्लाम