इंग्लंड संघाच्या कसोटी संघाची बेझबॉल रणनिती सर्वांनाच माहिती आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळी करून सामन्याचं रुपडं पालटलं जात होतं. आता मर्यादीत षटकांच्या फॉर्मेटसाठी इंग्लंडच्या ब्रँडन मॅक्युलम यांच्याकडेच धुरा सोपवण्यात आली आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर मॅथ्यू मॉट यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर या जागेसाठी ब्रँडन मॅक्युलम यांची निवड झाली आहे. मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक आहेत आणि 1 जानेवारी 2025 पासून वनडे आणि टी20 संघाची धुरा सांभाळतील. एका अर्थाने वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये नव्या रणनितीचा अवलंब होईल असं दिसत आहे. कारण ब्रँडम मॅक्युलम जेव्हा इंग्लंड कसोटी संघाचे कोच झाले तेव्हा त्यांनी याबाबत संघाची मानसिकता बदलली. कसोटीत खेळाडू वनडेसारखे खेळताना दिसतात. मॅथ्यू मॉट यांच्या कारकिर्दीत इंग्लंडची वनडे आणि टी20 वर्ल्डकपमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली होती. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. आता 1 जानेवारीपर्यंत मार्कस ट्रेसकोथिक यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी असणार आहे.
नव्या करारानुसार ब्रँडन मॅक्युलम 2027 या वर्षाच्या शेवटपर्यंत इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. ब्रँडन मॅक्युलम यांनी या प्रोजेक्टबाबत आनंद व्यक्त केला आहे. ब्रँडन मॅक्युलम यांनी सांगितलं की, ‘मी हे नवीन आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे. मी कर्णधार जोस बटलरसोबत काम करण्यास उत्सुक आहे. तसेच टीमचा पाया भक्कम करण्यासाठी आतापासून पायभरणी केली जात आहे. यासाठी आतापासूनच निर्णय घेतले जात आहेत.’
ब्रँडन मॅक्युलम आपल्या नव्या जबाबदारीची सुरुवात भारत दौऱ्यापासून करतील. जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यासोबत ब्रँडन मॅक्युलमच्या खांद्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टी20 वर्ल्डकप 2026 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 ची धुरा असेल. आता त्यांच्या कार्यकाळात इंग्लंड संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.