दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं खापर कर्णधार ऋषभ पंतने असं फोडलं, काय चूक झाली ते सांगितलं

| Updated on: Mar 23, 2024 | 8:05 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 4 गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना गेल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र शेवटी पंजाबने बाजी मारली.

दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचं खापर कर्णधार ऋषभ पंतने असं फोडलं, काय चूक झाली ते सांगितलं
दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, काय घडलं ते स्पष्ट सांगून टाकलं
Follow us on

आयपीएल स्पर्धेचा थरार खऱ्या अर्थाने सुरु झाला आहे. प्रत्येक सामन्यात वेगळेपण अनुभवायला मिळत आहे. अगदी शेवटच्या षटकापर्यंत विजय कोणाचा होईल हे सांगता येत नाही. शेवटच्या षटकात 20 धावा आवश्यक असल्या तरी सामन्याचं रुपडं पालटू शकतं हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे विजयाचं भाकीत करणं वाटतं तितकं सोपं नाही. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत पंजाब किंग्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच दिल्ली कॅपिटल्सला 174 धावांवर रोखलं. म्हणून विजयासाठी 175 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान सोपं वाटत असलं तरी दिल्लीच्या गोलंदाजांनी सामन्यात बऱ्याचदा कमबॅक मिळवून दिलं होतं. पण मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याने सामना गमवण्याची वेळ आली. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने चुकांचा पाढा वाचला. नेमकं काय चुकलं आणि यापुढे काय काळजी घेणार ते सांगून टाकलं.

“खरं सांगायचं तर इशांत शर्माची दुखापत मैदानात स्पष्ट दिसत होती. पण आमच्याकडे एक गोलंदाज शॉर्ट होता. कारण आमची फलंदाजी हवी तशी झाली नाही. त्यामुळे अभिषेक पोरेलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरावं लागलं. त्याने शेवटच्या षटकात ठोकलेल्या धावांमुळे सामन्यात रंगत आली. पण आमच्याकडे एक बॉलर शॉर्ट होता. असं असलं तरी आमच्या खेळाडूंनी वारंवार सामन्यात आणण्याचा चांगला प्रयत्न केला.”,असं ऋषभ पंतने सांगितलं.

“पराभवासाठी कारण देणं चुकीचं ठरेल. एक बॉलर शॉर्ट असणं हे काही चांगलं नाही. पण विजयाचं श्रेय पंजाब किंग्सच्या खेळाडूंना द्यावं लागेल.”, असंही ऋषभ पंत पुढे म्हणाला. अभिषेक पोरेलबाबत विचारताच ऋषभ पंत म्हणाला की, “पोरेलचा हा तिसरा की चौथा सामना आहे. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली ती खरंच खास आहे. त्याच्याकडून पुढच्या सामन्यात अपेक्षा असतील.”

“मी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना थोडा नर्वस होतो. थोडंफार डोक्यावर टेन्शन होतं. पण मी आता खेळाचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे.”, असं ऋषभ पंत पुढे म्हणाला. ऋषभ पंतने 13 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या.