मुंबई : भारताने पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया कप चषकावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्याचा निकाल अवघ्या तीन तासात लागला. तीन वाजता सुरु झालेला 50 षटकांचा सामना अवघ्या तीन तासात संपला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 92 चेंडू खेळले आणि 50 धावा करत संपूर्ण संघ तंबूत परतला. भारताने श्रीलंकेनं दिलेलं लक्ष्य एकही गडी न गमावता पूर्ण केलं आणि जेतेपदावर आठव्यांदा नाव कोरलं. मोहम्मद सिराज याने या सामन्यात 6 गडी बाद करत श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. तर कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात ओपनिंगला आला नाही. त्याने शुबमन गिल आणि इशान किशनला सलामीला पाठवलं. या दोघांनी 37 चेंडूत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आनंद व्यक्त केला आहे.
“आमची ही सर्वोत्त कामगिरी होती. फायनलमध्ये आशा पद्धतीने खेळणं तुम्ही मानसिकरित्या सक्षम असल्याचं दाखवतं. गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली आणि फलंदाजांनी तितक्याच हळूवारपणे सामना संपवला. मी स्लिपमध्ये उभा होतो आणि निरीक्षण करत करतो. खरंच सीमर्स खूप मेहनत घेत आहेत. त्यांचं लक्ष्य अगदी स्पष्ट आहे. सिराजला खूप श्रेय द्यावे लागेल. या स्पर्धेत एक संघ म्हणून जे काही साध्य करता आले ते आम्ही केले.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.
“ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका आणि त्यानंतर येणाऱ्या विश्वचषकाकडे आता आमचं लक्ष लागून आहे. दबावात हार्दिक आणि इशान यांनी पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली. केएल आणि विराट यांनी शतकं झळकावली. गिल सुद्धा फॉर्मात आहे. खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. “, असं रोहित शर्मा याने पुढे सांगितलं.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघाचा हा दुसरा विजय आहे. टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदा 1984 मध्ये जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018 आणि आता 2023 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. आशिया कप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका नवव्यांदा अंतिम फेरीत खेळले. यात टीम इंडियाने श्रीलंकेला सहावेळा, श्रीलंकेने भारताला 3 वेळा पराभूत केलं आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना