मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास जबरदस्त कामगिरी करत गाठला आहे. कुठेच जर तरच गणित नाही. 9 पैकी 9 सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडशी सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. पण 2019 वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. पण आता त्यावर फुंकर घालून पुन्हा नव्या दमाने सामोरं जाणं गरजेचं आहे. कर्णधार रोहित शर्मा याने हीच बाब पत्रकार परिषदेत अधोरेखित केली. ‘ कोणता संघ बेस्ट हे सांगणं कठीण आहे. मी 2011 च्या वर्ल्डकपमध्ये खेळलो नाही. पण तो वर्ल्डकप आपण जिंकलो होते. मी 2015 आणि 2019 च्या वर्ल्डकपमध्ये खेळलो. मी असं सांगू शकत नाही की 2019 चा संघ 2023 पेक्षा चांगला होता. फक्त जबाबदाऱ्यांबाबत सांगू शकतो. टीमसाठी माझा रोल स्पष्ट आहे. वेळ आल्यास खेळाडूंना नशिबाची साथ मिळेल.’, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
“न्यूझीलंडचा संघ एक स्मार्ट संघ आहे. एक बॅलन्स असलेला संघ आहे. न्यूझीलंड विरोधकांचा माइंडसेट बऱ्यापैकी समजते.” असंही रोहित शर्मा म्हणाला. वानखेडेवर नाणेफेकीचा कौल किती महत्त्वाचा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने यावर उत्तर देत सांगितलं की, ‘टॉस इथे महत्त्वाचा मुद्दा नाही. वानखेडेवर मी खूप क्रिकेट खेळलो आहे.’ साखळी फेरीत वानखेडेवर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध खेळली आहे. या सामन्यात रोहित शर्मा नाणेफेकीचा कौल हरला होता. तर श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाला पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या रुपाने धक्का बसला होता. त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी डाव सावरला.
रोहित शर्माने ड्रेसिंग रुममधील सकारात्मक वातावरणाबाबतही आपलं मत मांडलं. “धर्मशालेथ न्यूझीलंड विरुद्ध सामना होता. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. पण यात कोण जिंकलं ते मी सांगणार नाही. पण टीम इंडियातील खेळाडूंमध्ये चांगलं वातावरण आहे. “, असं रोहित शर्मा पुढे म्हणाला.