CCL 2024 : सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तेलगू वॉरियर्सचा विजय, भोजपुरी दबंगचा 8 रन्सने केला पराभव

| Updated on: Feb 24, 2024 | 8:59 PM

तेलुगू वॉरियर्सने मनोज तिवारीच्या भोजपुरी दबंग्सवर 8 धावांनी विजय मिळवून सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये विजयी सुरुवात केली. भोजपुरी दबंग्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेलुगू वॉरियर्सने दमदार सुरुवात केली .

CCL 2024 : सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तेलगू वॉरियर्सचा विजय,  भोजपुरी दबंगचा 8 रन्सने केला पराभव
Follow us on

मुंबई : सेलिब्रेटी क्रिकेट लीग 2024 स्पर्धा सुरु असून दुसरा साना तेलगू वॉरियर्स आणि भोजपुरी दबंग यांच्यात पार पडला. हा सामना तेलगू वॉरियर्सने 8 धावांनी जिंकत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. सेलिब्रेटी क्रिकेट लीगचा फॉरमॅट 20 षटकांचा आहे. पण यात कसोटीप्रमाणे 10 षटकांचे दोन डाव खेळले जातात. म्हणजे पहिल्या 10 षटकांचा खेळ होतो. त्यानंतर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा 10 षटकं खेळली जातात. भोजपुरी दबंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच तेलगू वॉरियर्सला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. तेलगू वॉरियर्सने पहिल्या डावात 10 षटकात 3 गडी गमवून 94 धावा केल्या. अश्विन बाबूने सर्वाधिक नाबाद 37 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भोजपुरी दबंग्सने 4 गडी गमवून 103 धावा केल्या. तसेच सामन्यात 9 धावांची आघाडी घेतली. आदित्य ओझा सर्वाधिक 43 धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात अश्विन बाबू उतरला आणि 26 चेंडूत 56 धावा ठोकल्या. तसेच फक्त एक गडी गमवून 118 धावा केल्या. पण आधीच्या 9 धावांची आघाडी वजा करता 109 झाल्या. त्यामुळे विजयासाठी 109 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान गाठणं भोजपुरी दबंगला काही जमलं नाही. भोजपुरी दबंगने 10 षटकात 2 गडी गमवून 101 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी 8 धावा तोकड्या पडल्या. तेलगू वॉरियर्सने भोजपुरी दबंगवर 8 धावांनी विजय मिळवला. यंदा सेलिब्रेटी क्रिकेट लीगचं हे दहावं वर्ष आहे.  मनोरंजन विश्वातील तारे क्रिकेट मैदानात खेळताना पाहून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होतं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

तेलुगु वॉरियर्स संघ : अखिल अक्किनेनी (कर्णधार), सचिन जोशी, अश्विन बाबू, सुधीर बाबू, आदर्श, नंदा किशोर, रघू, प्रिन्स, हरीश, एस एस थमन, सम्राट

भोजपुरी दबंग संघ : मनोज तिवारी (कर्णधार), आदित्य ओझा, असगर खान, अयाज खान, जय यादव, दिनेश लाल यादव, उदय तिवारी, अंशुमन सिंग राजपूत, सुधीर सिंग, राम यादव, विक्रांत सिंग