Video : वॉशिंग्टन सुंदरसोबत चिटिंग? नाबाद होता, पण तिसऱ्या पंचांनी दिला बाद!

| Updated on: Jan 03, 2025 | 7:42 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालला विचित्र पद्धतीने बाद दिल्यानंतर पाचव्या कसोटीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. या निर्णयामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळाली आहे. आता सोशल मीडियावर यावरून बराच वादंग सुरु आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉननेही आश्चर्य व्यक्त केला आहे.

Video : वॉशिंग्टन सुंदरसोबत चिटिंग? नाबाद होता, पण तिसऱ्या पंचांनी दिला बाद!
Image Credit source: PTI
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाचा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या मालिकेवर भारताचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी अपेक्षा आहे. मात्र सिडनी कसोटीत पुन्हा एकदा खराब पंचगिरीचं दर्शन घडलं. विराट कोहलीला नाबाद दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोटातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला बाद दिल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी पंचांना मैदानात हूटिंग केलं. क्रीडाप्रेमींना वॉशिंग्टन सुंदरला बाद देणं जराही आवडलं नाही. क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर आपला रागही व्यक्त केला आहे. यापूर्वी मेलबर्न कसोटीतही यशस्वी जयस्वालला अशाच पद्धतीने बाद दिलं होतं. तेव्हाही वाद झाला होता.

टीम इंडियाची स्थिती 134 धावांवर 7 बाद अशी होती. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरकडू फार अपेक्षा होत्या. तळाशी चांगली फलंदाजी करून धावांमध्ये भर घालेल अशी आशा होती. पण संघाच्या 148 धावा असताना पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोरदार अपील झाली. विकेटच्या मागेच एलेक्स कॅरीने चेंडू पकडण्यात कोणतीच चूक केली नव्हती. जोरदार अपील केल्यानंतर मैदानी पंचानी त्याला नाबाद असल्याचं सांगितलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. पण सुंदरला निर्णायक पुराव्याशिवाय बाद घोषित केलं. यामुळे पुन्हा एकदा पंचगिरी आणि तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

इतकंच काय तर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘यातून बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही. हा एक विचित्र निर्णय आहे.’, असं ट्वीट मायकल वॉनने केलं आहे. एका युजर्सने लिहिलं की ‘स्निकोमीटरवर जी काही हालचाल दिसली ती पाय स्टंपजवळ घासून गेल्यानंतरची आहे. जे काही होतं ते चेंडू स्टंपच्या जवळ येण्यापूर्वीचा होता.’ पंचाच्या चुकीचा फटका संपूर्ण संघाला बसतो यात काही शंका नाही.  त्यामुळे क्रीडाप्रेमी या निर्णयावर वारंवार टीका करत आहेत. जर तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर होत नसेल तर त्याचा उपयोग काय असाही प्रश्न विचारला जात आहे.