मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आतापासून तयारी सुरु आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेचे वारे वेगाने वाहू लागलेत. खेळाडूंची अदलाबदलीपासून कर्णधारपद वगैरे बऱ्याच बातम्यांनी आयपीएल चर्चेत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मिनी लिलाव होणार आहे. यासाठी सर्व फ्रेंचायसी सज्ज झाल्या आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयने एक लिस्ट जारी केली त्यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली. या लिस्टमधील खेळाडूंच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. यात नवोदित खेळाडू चेतन सकारिया याचंही नाव असल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून रिलीज केलेल्या चेतन सकारियाचं नाव या यादीत पाहून चर्चांना उधाण आलं. चेतनच्या गोलंदाजी शैलीत नेमक्या काय त्रुटी आहेत याबाबत खलबतं सुरु झाली. मात्र बऱ्याच कालावधीनंतर बीसीसीआयला संदर्भ लागला आणि त्यांनी क्रॉस चेक केलं त्यानंतर खरं काय ते समोर आहे. खऱ्या अर्थाने चोर सोडून संन्याशाला फाशी असंच काहीसं म्हणावं लागेल.
चेतन सकारिया मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. मात्र 2024 पर्वापूर्वी सकारियाला रिलीज केलं आहे. 19 डिसेंबरला होणाऱ्या लिलावाच्या रोस्टरमध्ये 27व्या स्थानावर असेल. त्याची बेस प्राईस 50 लाख रुपये असेल. एकाच नावामुळे बीसीसीआयकडून चूक झाल्याचं समोर आलं आहे. कर्नाटकच्या चेतन नावाच्या गोलंदाजाच्या जागी सौराष्ट्राच्या चेतन सकारियाचं नाव यादीत टाकलं गेलं. गोंधळाचं वातावरण शमवण्यासाठी बीसीसीआयने चूक दुरूस्त केली आणि चेतन सकारियाचं नाव यादीतून दूर केलं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
“हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे. चेतनला चुकीच्या शैलीसाठी कधीही बोलवलं गेलं नाही. त्याचं नाव या यादीत नाही. खरं तर त्याचं नाव चुकून आलं. पण त्याच्या ऐवजी कर्नाटकच्या गोलंदाजाचं नाव असायला हवं. आयपीएल फ्रेंचायसींना याबाबतची माहिती दिली जात आहे.” असं जयदेव शाह यांनी सांगितलं.
चेतन सकारिया आतापर्यंत 19 आयपीएल सामने खेळला आहे. यात त्याने 20 गडी बाद केले आहेत. 31 धावा देत 3 गडी बाद ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर आयपीएलमध्ये 7 डावात खेळण्याची संधी मिळाली आहे. यात त्याने एकूण 20 धावा केल्या आहेत.