ठाणे : राजकीय पुढाऱ्यांना आपण केवळ जाहीर सभांमधूनच भाषणबाजी करताना आणि चौफेर फटकेबाजी करताना पाहतो. पण या पुढाऱ्यांमध्ये इतरही अनेक चांगले गुण असतात. काहींना बुद्धिबळ खेळण्याचं वेड आहे, काहींना क्रिकेटचं मैदान गाजवायला आवडतं तर काहींना पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्याला अपवाद नाहीत. शिंदे यांनी काल चक्क क्रिकेटच्या मैदानावर उतरून जोरदार फटकेबाजी केली. चौकार, षटकारांची आतषबाजी करत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिलं. साक्षात मुख्यमंत्र्यांनाच तुफान फटकेबाजी करताना पाहून खेळाडूंचाही चांगलाच उत्साह वाढला.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली. मुख्यमंत्र्यांनी आलेल्या प्रत्येक चेंडू सीमापार केला. मुख्यमंत्र्यांची ही तुफान फटकेबाजी पाहून खेळाडूंनीही टाळ्या वाजवून जोरदार जल्लोष केला.
ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असून यंदा त्यात अनेक संघ सहभागी झाले आहेत. टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. काल वेळात वेळ काढून मुख्यमंत्री या स्पर्धेला हजर राहिले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील डाव्होस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रवाना झाले. डाव्होसला जाण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन त्यांना विनम्रपणे अभिवादन केले.
एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास ज्या धर्मवीरामुळे शक्य झाला त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. परदेशात रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शक्ती स्थळाला आवर्जून भेट दिली. त्यांची ही कृती शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, टेंभी नाका बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, नितेश पाटोळे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.