महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये राज्य सरकारकडून टीम इंडियामधील चार महाराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सभागृहात दमदार बॅटींग केली. चारही खेळाडूंना 1 कोटी रूपयांचं बक्षीस देण्यात आलं. तर मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाला 11 कोटी देणार असल्याचं जाहीर केलं. त्याआधी सूर्यकुमार आपल्या भाषणामध्ये एक गोष्ट बोलून गेला,शिंदेंनी ते बरोबर हेरलं आणिआपल्या भाषणावेळी सूर्याला त्याची आठवण करून दिली.
आमचं राजकारणही क्रिकेटसारखं आहे. कधी कोण कोणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही. सुर्यकुमार यादवचा कॅच जसं कोणी विसरणार नाही त्याप्रमाणे आमच्या ५० जणांच्या टीमने घेतलेली विकेटही कोणी विसरणार नाही. हा खेळ खेळाडूंचा असून कोणत्या जाती-धर्माचा नाही. भाषणामधून आमचे सदस्य चौकार आणि षटकार मारत असतात. हे विजेतेपद टी-२० पूरतं मर्यादित नाही तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगनभरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचं एक प्रतिक आहे. रोहित कायम हिट राहा, सूर्यकुमार कायम तळपत राहा, जयस्वाल सदैव यशस्वी व्हा, दुबेच्या नावामध्ये साक्षात शिव आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण भारताची विजयी पताका अशीच फडकवत राहा. भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी यापुढेही देत राहा, असं शिंदे म्हणाले.
सुर्यकुमार यादव याने सभागृहामध्ये आश्वासन दिलं आहे. आणि सभागृहात पद्धत आहे, एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं. पुढचा वर्ल्ड कप आम्ही जिंकू, असं आश्वासन सूर्याने दिलंय. आपल्याकडे एक आश्वासन समितीसुद्धा आहे, एकनाथ शिंदे असं म्हणताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.
एक कॅप्टन म्हणून रोहितने आपली प्रतिभा उभी केली. रोहितने आपल्याला आनंद आणि दु:ख दिलं, वर्ल्ड कपही जिंकत आनंद आणि निवृत्ती घेत दु:खही दिलं. भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची यादी आहे ज्यांच्याशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होत नाही त्या यादीत आता रोहितचं नाव गेलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.