मुंबई : दिग्गज सलामीवीर शिखर धवन, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यरसारखे टॉप भारतीय खेळाडू तसेच पॅट कमिन्स आणि कागिसो रबाडा सारखे दिग्गज परदेशी खेळाडू इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या लिलावात (IPL 2022 Mega Auction) सहभागी झाले आहेत. या खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रुपये आहे. हा महा लिलाव (IPL 2022 Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे होणार आहे. दोन दिवसीय लिलावादरम्यान (IPL 2022) 590 खेळाडूंवर बोली लावली जाईल. आयपीएलने मंगळवारी अंतिम लिलाव यादी जाहीर केली, गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या 1,214 खेळाडूंच्या मूळ यादीतून अर्ध्याहून अधिक खेळाडूंना वगळले. ही यादी फ्रँचायझी संघांच्या खेळाडूंमधील आवडीवर आधारित आहे.
सहभागी 590 क्रिकेटपटूंपैकी, एकूण 228 कॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने खेळले) खेळाडू आहेत, तर 355 खेळाडू असे आहेत ज्यांनी त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. तसेच यात सात सहयोगी (असोसिएट) देशांचे खेळाडूदेखील आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनीही स्वत:ला टॉप बेस प्राइसवाल्या सेक्शनमध्ये स्थान दिले आहे. अय्यर आणि धवन अव्वल यादीत आहेत परंतु लिलावात सहभागी होणारे 10 संघ इशान किशन, देवदत्त पडिकल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, गेल्या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा हर्षल पटेल, फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर या युवा खेळाडूंसाठी मोठमोठ्या बोली लावताना पाहायला मिळतील. हे सर्व खेळाडू 2 कोटी रुपयांच्या टॉप बेस प्राइस श्रेणीत आहेत. या लिलावात एकूण 370 भारतीय खेळाडू आणि 220 परदेशी क्रिकेटपटू सहभागी होणार असून त्यापैकी 48 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या श्रेणीत स्वत:ला स्थान दिले आहे. (सर्व 590 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
परदेशी खेळाडूंमध्ये, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ, बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस यांच्यावर फ्रेंचायझी संघांकडून मोठी बोली लावली जाऊ शकते. हे सर्व खेळाडू अव्वल दर्जाच्या यादीत आहेत. सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा सारख्या भारतीय दिग्गज खेळाडूंची बेस प्राईसदेखील 2 कोटी रुपये आहे परंतु त्यांच्यासाठी फ्रेंचायझी पूर्वीसारखे स्वारस्य दाखवणार नाहीत. लिलावाच्या यादीत 20 खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये आहे तर 34 खेळाडूंची बेस प्राईस 1 कोटी रुपये आहे. (सर्व 590 खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
भारताचे अंडर-19 स्टार्स, कर्णधार यश धुल, विकी ओस्तवाल आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्यासह शाहरुख खान, दीपक हुडा आणि आवेश खान हे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले खेळाडू या लिलावात सहभागी आहेत. या खेळाडूंवर चांगली बोली लागेल असे अपेक्षित आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज 42 वर्षीय इम्रान ताहिर हा लिलावात सहभागी झालेला सर्वात वयस्कर खेळाडू आहे तर अफगाणिस्तानचा 17 वर्षीय नूर अहमद हा सर्वात तरुण खेळाडू आहे. नूर वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला होता. सर्व भारतीय अंडर-19 खेळाडूंमध्ये, मध्यमगती गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरची लिलावातील बेस प्राईस 30 लाख रुपये आहे, तर इतरांची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे.
इतर बातम्या
IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?
IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?