मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगमधील महामुकाबला मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सुरू आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 132 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीच्या पहिल्या 3 विकेट्स लवकर पडल्या होत्या. त्यामुळे दिल्लीची एकदम खराब सुरूवात झालेली पाहायला मिळाली. यातील पहिली विकेट सलामीवीर शफाली वर्मा हिची गेली. फुलटॉस चेंडूवर शफाली बाद झाली हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला होता. त्यांनीही बाद असल्याचा निर्णय दिला खरा पण यावरून नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे.
फायनलमध्ये सलामीला उतरलेल्या शफालीने सिक्स आणि चौकार मारत सुरूवात केली होती. मात्र फुलटॉस चेंडूवर ती झेलबाद झाली. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की तो नो बॉल असून शफाली नाबाद आहे. मात्र पंचांच्या दिलेल्या निर्णयामुळे तिला पव्हिलियनमध्ये जावं लागलं.
पाहा व्हिडीओ-
The WICKET of Shafali Verma ‼️ #CricketTwitter #WPL2023 #DCvMI ? Jio Cinema pic.twitter.com/gzPXqYwbJ0
— Female Cricket (@imfemalecricket) March 26, 2023
दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. त्यामुळे दिल्लीची 79-9 अशी स्थिती झाली होती. यामुळे दिल्ली अडचणीत सापडली. मात्र शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी दिल्लीची लाज राखली. या दोघींनी केलेल्या खेळीमुळे दिल्लीला सन्मानजनक आव्हान देता आलं.
राधा यादव आणि शिखा पांडे या जोडीने 10 विकेट्ससाठी 52 धावांची निर्णायक आणि नाबाद भागीदारी केली. यादरम्यान शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 27 धावांची नाबाद खेळी केली. या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. दिल्लीला या भागीदारीमुळे मुंबईला 132 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं.