मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. हा सामना झाल्यानंतर जो काही वाद झाला त्यामुळे जास्तच चर्चेत आला. कारण आजी माजी खेळाडू असलेले गौतम गंभीर आणि विराट कोहली भिडले. दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. यामुळे दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. दोघांच्या सामना मानधनातून 100 टक्के फी दंड म्हणून आकारली आहे. या पूर्ण घटनाक्रमानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टचा संबंध थेट वादाशी जोडला जात आहे.
विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, ते तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.”
सामन्यातील वादानंतर माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. तसेच झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खेळाडूंनी एकमेकांचा आदर करायला हवं असं स्पष्टपणे सांगितलं.
“खेळताना बऱ्याच भावना आपल्या मनात असतात. पण त्या अशा पद्धतीने व्यक्त करू नये. बोलण्यापर्यंत ठिक आहे. पण सामन्यात जे काही झालं ते चुकीचं आहे. तुम्हाला एकमेकांचा आदर करायला लागेल. खेळ भावना जपली पाहीजे.”, असं अनिल कुंबळे याने सांगितलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनऊ सुपर जायंट्सने विरुद्धचा सामना 18 धावांनी जिंकला. या विजयासह बंगळुरुला गुणतालिकेत चांगला फायदा झाला आहे.पाचव्या स्थानावर बंगळुरुने 10 गुणांसह झेप घेतली आहे. आता गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.