टीम इंडियाचा वर्ष 2024 मधील कसोटी सामन्यांचा शेवट कटू झाला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. खरं तर हा सामना ड्रॉ करता आला असता, पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी चुका केल्या आणि त्याचा भुर्दंड पराभवाच्या माध्यमातून भरावा लागला. दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकड, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे. भारताचं संपूर्ण गणित जर तर वर अवलंबून आहे. तर ऑस्ट्रेलियाने तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 2024 या वर्षात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया एकूण 14 सामने खेळली. त्यापैकी सामन्यात 7 सामन्यात पराभव, 6 सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. असं असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वर्षातील बेस्ट कसोटी संघाची निवड केली आहे. त्याचं नेतृत्व भारतीय क्रिकेटपटूला दिलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बेस्ट कसोटी संघासाठी वर्षाभरात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंची निवड केली आहे. सहा देशातील कसोटी संघातील खेळाडूंचा यात समावेश आहे या संघात कसोटीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला स्थान दिलं आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री आणि रचिन रवींद्रचा या संघात समावेश आहे. इंग्लंडच्या जो रूट, बेन डकेट आणि हॅरी ब्रूकचा समावेश आहे. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिस आणि दक्षिण अफ्रिकेच्या केशव महाराजचा संघात समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि विकेटकीपर बॅटर एलेक्स कॅरेला संघात स्थान मिळालं आहे. इतकंच काय तर या संघाचं नेतृत्व भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सोपवलं आहे.
What a year from this XI including Jasprit Bumrah who leads the side 🙌
Full story: https://t.co/zM0nfiRxz9 pic.twitter.com/cn8Zu7zlxw
— cricket.com.au (@cricketcomau) December 31, 2024
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला पुरुषांचा 2024 या वर्षातील बेस्ट कसोटी संघ: यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, जो रूट, रचिन रवींद्र, हॅरी ब्रूक, कामिंडू मेंडिस, एलेक्स केरी (विकेटकीपर), मॅट हेन्री, जसप्रीत बुमराह (कर्णधार), जोश हेझलवूड, केशव महाराज.