क्रिकेटपटू दीपक चाहरने समोर आणला गैरप्रकार, पुराव्यासह सोशल मीडियावर मांडली बाजू

| Updated on: Feb 25, 2024 | 10:39 PM

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरसोबत मोठा स्कॅम झाल्याचं उघड झालं आहे. काहीच मिळालं नसताना डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला आणि पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर त्याने सर्व प्रकरण सोशल मीडियावर पुराव्यानिशी मांडलं. तसेच झालेला गैरप्रकार उघड केला.

क्रिकेटपटू दीपक चाहरने समोर आणला गैरप्रकार, पुराव्यासह सोशल मीडियावर मांडली बाजू
क्रिकेटपटू दीपक चाहरसोबत मोठा स्कॅम, पुराव्यासह सोशल मीडियावर सर्वकाही केलं उघड
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज दीपक चाहरसोबत घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरं तर असे प्रकार इतरांसोबतही घडत असावेत पण दीपक चहरने त्याला वाचा फोडली. दीपक चाहरने सर्व प्रकरण पुराव्यानिशी उघड केलं. त्यामुळे कंपनीही खडबडून जागी झाली. तसेच झाल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली आहे. दीपक चहरने फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोवर ऑर्डर केली होती. बराच वेळ त्याने आपल्या खाद्यपदार्थाची वाट पाहिली मात्र फूड काही आलं नाही. मात्र डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे दीपक चहरच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याला कळलंच नाही असं कसं झालं. चुकून दुसऱ्याच्या घरी तर फूड डिलिव्हरी झालं नाही ना, असा त्याला संशय आला. पण तसं काहीच झालं नव्हतं.

दीपक चाहरने सोशल मीडिया व्यासपीठ एक्सवर लिहिलं की, “भारतात नवा फ्रॉड सुरु झाला आहे. झोमॅटोवरून खाणं ऑर्डर केलं होतं पण एपवर डिलिव्हरी झालं असं दाखवलं जात आहे. पण हाती काहीच मिळालं नाही. ग्राहक सेवेला कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, डिलिव्हरी झाली आहे आणि खोटं बोलत आहे. मला खात्री आहे की, अशाच प्रकारे इतरांनाही त्रास झाला असेल.” त्यानंतर त्याने देशातील नागरिकांना आव्हान केलं की, तुमच्यासोबतही असं झालं असेल तर व्यथा मांडा.

दीपक चाहरने पोस्ट केल्यानंतर काही मिनिटातच वाऱ्यासारखी पसरली. हॅशटॅग झोमॅटोमुळे कंपनीला काही कळेना झालं. अखेर त्यांनी दीपक चाहरच्या तक्रारीची दखल घेतली. तसेच कंपनीने चाहरला टॅग करत लिहिलं की, “दीपक तुम्हाला असा अनुभव आला यामुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत. असुविधेसाठी आम्ही तुमची माफी मागतो. पण तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. लवकरच यावर तोडगा काढू.”

दीपक चाहर टीम इंडियाकडून १३ वनडे, २५ टी२० सामने खेळला आहे. वनडेत त्याने एकूण २०३ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याचा ६९ ही धावसंख्या सर्वोत्तम आहे. तर टी२० मध्ये एकूण ५३ धावा केल्या असून ३१ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये एकूण ७३ सामने खेळला असून ८० धावा आणि ७२ विकेट्स घेतल्या आहेत. चाहर आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सज्ज आहे.