टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. नवा विजेता लवकरच जाहीर होणार आहे. टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण या स्पर्धेपूर्वीच राहुल द्रविड याचा प्रशिक्षपदाच्या कार्यकाळातील शेवटची स्पर्धा असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे बीसीसीआयने प्रशिक्षपदासाठी अर्ज मागवले होते. कारण राहुल द्रविडचा कार्यकाळ संपताच ही धुरा योग्य व्यक्तीच्या हाती सोपवली जाईल. यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचं नाव आघाडीवर आहे. गौतम गंभीर वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. तसेच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वात दोन चषक पटकावले आहेत. तर मेंटॉरची भूमिका बजवताना यंदाचं जेतेपद कोलकात्याला मिळालं आहे. त्यात गौतम गंभीर हा आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंचे त्याच्या नावानेच धाबे दणाणले आहेत. असं सर्व असताना मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्यापूर्वी गौतम गंभीरने यो-यो टेस्टवर टीका केली आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यो-यो टेस्ट हा चर्चेता विषय ठरला आहे. या टेस्टचा निकष निवडसाठी लावला जात होता. कोरोनापूर्वी टीम इंडियात खेळण्यासाठी ही चाचणी पास होणं आवश्यक होतं. पण कोरोना काळात हा नियम शिथिल करण्यात आला. आता गौतम गंभीरने या टेस्टवर टीकास्त्र सोडलं आहे. या चाचणीत खेळाडू पास झाला नाही तर त्याला डावलणं चुकीचं असल्याचं म्हंटलं आहे. खेळाडूने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सिद्ध करणअयासाठी ही चाचणी पास करणं मला मान्य नाही. फिटनेसचा थेट संबंध ट्रेनरशी असायला हवा.
“यो-यो चाचणीमुळे एखाद्याची निवड होत नसेल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला खेळाडूची प्रतिभा, लढाऊ कौशल्य, गोलंदाजी कौशल्य यावर आधारित निवड करावी लागेल. त्यांच्या तंदुरुस्तीवर काम करत राहणे आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सुधारणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. जर कोणी यो-यो चाचणी उत्तीर्ण झाले नाही आणि संघासाठी निवडले नाही, तर मला वाटते की ते अन्यायकारक आहे.”, असं गौतम गंभीर म्हणाला. या चाचणीत युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्ती असे अनेक खेळाडू नापास झाले हे देखील विशेष आहे.