टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी आली आहे. मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधानसभेमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवन दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रूपये दिले. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रूपयांची घोषणा केली. विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांचं कौतुक केलं. यावेळी फडणवीसांनी रोहित शर्माचं कौतुक करताना त्याची एक गोष्ट सर्व नेत्यांना शिकायला लावली आहे.
एक कॅप्टन म्हणून रोहितने आपली प्रतिभा उभी केली. रोहितने आपल्याला आनंद आणि दु:ख दिलं, वर्ल्ड कपही जिंकत आनंद आणि निवृत्ती घेत दु:खही दिलं. भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची यादी आहे ज्यांच्याशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होत नाही त्या यादीत आता रोहितचं नाव गेलं आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव आणि धोनीनंतर रोहित तिसरा कर्णधार ठरला आहे. माझा राजकीय लोकांना एक सल्ला आहे, पत्रकार परिषदेमध्ये कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजमधून उत्तर कसं देता येतं हे रोहितकडून शिकता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पाहा व्हिडीओ:-
टी-20 चा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. 50 सामने जिंकत सर्वाधिक विजय रोहितच्या नावावर आहेत. इतकंच नाहीतर रोहितने सर्वाधिक धावा, शतके आणि भागीदारी असे अनेक विक्रम केले आहेत. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहितने कॅप्टन म्हणून मिळवलेला विश्वास. टीममधील प्रत्येक खेळाडू रोहितविषयी आदराने आणि प्रेमाने बोलतो. त्यामुळे मला वाटतं की कोणालाही लीड करायचं असेल त्याने हे शिकलं पाहिजे की टीममधील प्रत्येक खेळाडूला विश्वास पाहिजे की, आमचा कॅप्टन विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. हे सर्व रोहितच्या वागण्यातून दिसून येतं, त्यामुळे एक उत्तम कॅप्टनची परंपरा आहे त्याला रोहितने चार चाँद लावण्याचं काम रोहितने केलं असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रोहितचं कौतुक केलं.