मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक पाहता पहिल्या टप्प्यातील सामने जाहीर केले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. यासाठी आयपीएलमधील 10 संघ सज्ज असून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच यंदाचं जेतेपद कोणाला मिळणार याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघात बरीच उलथापालथ झाली आहे. काही खेळाडू नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याकडे सोपवलं गेलं आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहच्या क्रिप्टिक पोस्ट चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर मार्क बाउचरच्या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे संशयाला वाव मिळण्यासारखं बरंच काही घडलं आहे. असं असताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा एकाच संघात असून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इंस्टाग्रामवर एकमेकांचे पाय खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत.
तिलक वर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर हँडलवर कॅप्शनसह वर्कआऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर सूर्यकुमार यादवने आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. तसेच त्याला गंमतीने टोमणा मारला आहे. त्याला तितक्याच खेळीमेळीने तिलक वर्माने उत्तर दिलं आहे. या दोघांचं उत्तर प्रत्युत्तर पाहून क्रीडारसिकांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे. मी माझ्या मर्यादा वाढवत आहे असं सांगत तिलक वर्माने वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर सूर्यकुमारने उत्तर देत सांगितलं की, ते पाहू शकत नाही. लगेचच तिलक वर्माने उत्तर देत सांगितलं की, तुला ते लवकरच दिसेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत तिलक वर्मा शेवटचा दिसला होता. मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला होता आणि तिसऱ्या क्रमांकावर येत 22 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. विराट कोहली संघात आल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. तर सूर्यकुमार यादव दक्षिण अफ्रिकेत झालेल्या दुखापतीनंतर मैदानापासून दूर आहे. त्यात गेल्या महिन्यात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.