मुंबई : क्रिकेट स्पर्धेचं स्वरूप दिवसागणिक बदलत असल्याचं दिसून येत आहे. टेस्ट क्रिकेटनंतर, वनडे क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर छोट्या स्वरूपात झटपट खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे टी20..आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळाने अशी बरीच रुपं बदलली आहेत. दिवसा खेळला जाणारं क्रिकेट नंतर प्रकाशझोतात खेळलं जाऊ लागलं. वनडे स्पर्धेत डे नाईट, टी20 सामने तर पार संध्याकाळी होत आहेत. त्यात आता पिंक बॉल टेस्ट क्रिकेट सुरु केलं आहे. कसोटी सामना दिवस आणि रात्र असा खेळला जातो. पण संध्याकाळच्या वेळेत दव महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर खास रणनिती आखल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना धावांचा पाठलाग करणं सोपं होतं असं एकंदरीत चित्र आहे. पण प्रत्येक वेळी असंच गणित असेल असं नाही.मात्र यामुळे दोन्ही संघांना समान संधी मिळते का? असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रत्येक सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संध्याकाळी पडणारं दव पाहता पहिल्यांदा गोलंदाजीला प्राधान्य दिलं जात आहे. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं खूपच कठीण होतं. चेंडू ओला होत असल्याने पकड मिळणं कठीण होतं आणि गोलंदाजाची लाईन अँड लेंथ बिघडते. अनेकदा याबाबत आजी माजी खेळाडू सांगताना दिसतात. दव फॅक्टर महत्त्वाचं असल्याचं सांगतात.
कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देताना दिसत आहे. यासाठी अनेकदा कर्णधार दव पडत असल्याचं कारण देऊन नंतर फलंदाजी करणं सोपं होतं असं सांगतो. त्यामुळे खरंच दोन्ही संघांना समान संधी मिळते का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. भारत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 सामन्यात असाच फटका टीम इंडियाला पडला. ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांना धु धु धुतला. सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडने दव पराभवाला कारणीभूत असल्याचं सांगितलं होतं. तसेच चेंडू हातात पकडणं देखील कठीण होतं, असं सांगितलं.
क्रिकेटपटू आर. अश्विन याने दव पडत असल्याचं कारणामुळे सामने लवकर खेळवण्याचा सल्ला दिला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याने याबाबत सांगितलं होतं. सामना पार दुपारी 1.30 वाजता सुरु करण्याऐवजी सकाळी 11.30 वाजता करावा असा सल्ला दिला होता. त्यामुळे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला दव फॅक्टरचा फायदा मिळणार नाही. पण तसं काही झालं नाही,
ब्रॉडकास्टरचं गणित पाहता व्ह्यूअरशिपवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती आहे. पण त्यावरही अश्विनने सांगितलं की, क्रिकेटचे फॅन्स कधीही कोणत्याही वेळेला सामना पाहू शकतात. टी20 वर्ल्डकपही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हिवाळ्यात भरवला होता, यावरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.