मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा झाली आहे. दिग्गज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. पण या संघात निवडलेल्या एका नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे विकेटकीपर ध्रुव जुरेल..ध्रुव जुरेलला वयाच्या 22 व्या वर्षी टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळालं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचं नेतृत्व करणाऱ्या ध्रुव जुरेलला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंडिया ए टीमकडून खेळण्याची संधी मिळाली होती. रणजी ट्रॉफीमध्येही त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नावलौकिक असलेल्या ध्रुव जुरेलला कधीकाळी भारतीय सैन्य दलात रुजू व्हायचं होतं. यासाठी त्याने मनाची तयारीही केली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यामुळे आज देशासाठी क्रिकेटच्या मैदानात लढताना दिसणार आहे.
ध्रुव जुरेलचे वडील सैन्य दलात हवालदार होते. 1999 साली झालेल्या कारगील युद्धात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने सैन्याधिकारी व्हावं असं त्यांचंही स्वप्न होतं. ध्रुव देखील वडिलांच्या पथावर चालण्यासाठी सज्ज होता. पण ध्रुवने वडिलांना न सांगात क्रिकेट ट्रेनिंगमध्ये आपलं नाव नोंदवलं आणि येथून पुढे त्याचा प्रवास सुरु झाला. वडिलांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी त्याला ओरडलं. पण नियतीचा खेळात कोण कोणचं ऐकेल का? वेळ बदलत गेला तसा वडिलांचं मनंही बदललं. त्यांनी 800 रुपये कर्ज घेऊन ध्रुवला बॅट घेऊन दिली.
ध्रुवच्या क्रिकेट खेळण्याच्या निर्णयाने कौटुंबिक वातावरण पार बिघडून गेलं होतं. पण ध्रुवला त्याच्या आईने साथ दिली. मुलाला क्रिकेट देण्यासाठी गळ्याची चेनदेखील विकली. आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर सर्व चित्रच पालटून गेलं. आता टीम इंडियासाठी त्याची निवड झाल्याने कुटुंबियांची छाती अभिमानाने फुगली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही दूरची गोष्ट..पण वरिष्ठ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर अनुभक नक्कीच गाठिशी पडेल.
जुरेलने विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मागच्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने 15 सामन्यात 46 च्या सरासरीने 790 धावा केल्या. यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमुळेच भारतीय संघात त्याची निवड झाली आहे.