Team India: रहाणे-पुजाराच्या जागेसाठी दावेदार कोण? कार्तिकने या दोघांचा नाव घेतलं

| Updated on: Sep 02, 2024 | 4:58 PM

Border-Gavaskar Trophy Ind vs Aus Test: दिनेश कार्तिकने टीम इंडियातील दोन युवा खेळाडूंचं नाव घेत त्यांच्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांची जागा घेण्याची क्षमता असल्याचं म्हटलंय.

Team India: रहाणे-पुजाराच्या जागेसाठी दावेदार कोण? कार्तिकने या दोघांचा नाव घेतलं
ajinkya rahane cheteshwar pujara
Image Credit source: Icc X account
Follow us on

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा ही अनुभवी जोडी टीम इंडियापासून गेली अनेक महिने दूर आहे. या दोघांनी भारताला अनेकदा कसोटी सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. मात्र दोघांनाही गेल्या काही महिन्यात संधी मिळालेली नाही. टीम इंडियाला नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी जायचं आहे.टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा या कसोटी मालिकेत सलग दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाला यंदा विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. आता या दोघांना त्या मालिकेसाठी संधी मिळेल की नाही, हे तेव्हाच ठरेल. मात्र त्याआधी टीम इंडियाचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने या दोघांची रिप्लेसमेंट शोधून काढली आहे.

दिनेश कार्तिक काय म्हणाला?

कार्तिकने शुबमन गिल आणि सरफराज खान या दोघांचं रहाणे-पुजाराची रिप्लसमेंट म्हणून नावं घेतलं आहे. सरफराज आणि गिलमध्ये आगामी दौऱ्यात या अनुभवी जोडीची जागा घेण्याची क्षमता असल्याचं कार्तिकला वाटतं. कार्तिक क्रिकबझवर ‘हेसीबी विथ डीके’ या खास कार्यक्रमात बोलत होता. “शुबमन आणि सरफराज या दोघांनी मायदेशात काही महिन्यांआधी इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. या दोघांपैकी कुणीही एक जण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल आणि आपली छाप सोडेल. त्या दोघांमध्ये क्षमता आहे. या दौऱ्यानिमित्ताने ते रहाणे-पुजाराची जागा घेण्यासाठी सक्षम आहेत की नाही, हे समजेल”, असं कार्तिकने म्हटलं.

पुजारा 2018-19 च्या मालिकेत महत्त्वाचा खेळाडू होता. पुजाराने सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या. तर रहाणेच्या नेतृत्वात भारताने 2020-21 मध्ये भारताने ही मालिका जिंकली होती. तसेच शुबमन गिल याने याच मालिकेतून कसोटी पदार्पण केलं होतं. गिलने पदार्पणातील मालिकेतील एकूण 6 डावांमध्ये 259 धावांची खेळी केली होती. गिलने गाबा कसोटीत ऋषभ पंत याला शानदार साथ देत 91 धावांची निर्णायक खेळी केली होती.

शुबमन-सरफराज पुजारा-रहाणेच्या जागेसाठी दावेदार

तसेच सरफराजने मायदेशात इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं. सरफराजने 40 च्या सरासरीने 5 डावात 200 धावा केल्या होत्या त्यात 3 अर्धशतकांचा समावेश होता.