स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने भारताच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटसाठी संघ निवडला आहे. यात 5 फलंदाज, 2 अष्टपैलू, 2 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. या संघात नियमित विकेटकीपरला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत या खेळाडूंना त्याने डावललं आहे. क्रिकबझच्या इंडिपेंडेंस डे स्पेशल शोमध्ये दिनेश कार्तिकने प्लेइंग इलेव्हन निवडली. या प्लेइंग इलेव्हनमधून माजी कर्णधार सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना डावललं आहे. इतकंच काय तर संघात गौतम गंभीरलाही स्थान मिळालेलं नाही. ओपनिंगला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऐवजी रोहित शर्माला प्राधान्य दिलं आहे.
भारताकडून ओपनिंगला वीरेंद्र सेहवागसोबत रोहित शर्मा उतरेल. तिसऱ्या स्थानासाठी माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला स्थान दिलं आहे. नियमित विकेटकीपर नसल्याने ही भूमिका राहुल द्रविड बजावणार आहे. चौथ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान दिलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये द्रविड आणि सचिनने चांगली कामगिरी केली आहे. पाचव्या स्थानावर विराट कोहलीला संधी दिली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून युवराज सिंग आणि रवींद्र जडेजाची निवड केली आहे. युवराज सहाव्या, तर जडेजा सातव्या स्थानावर खेळेल.
फिरकीपटूची धुरा रविचंद्रन अश्विन आणि अनिल कुंबले यांच्या खांद्यावर असेल. दोघंही भारताचे यशस्वी गोलंदाज आहेत. तर वेगवाने गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह आणि जहीर खान यांची निवड केली आहे. तर दिनेश कार्तिकने 12 वा खेळाडू म्हणून हरभजन सिंगची निवड केली आहे. या संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार कोण असेल हे मात्र सांगितलं नाही. त्यामुळे क्रीडारसिकांनी आपल्या सोयीनुसार कर्णधार ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
दिनेश कार्तिकने तिन्ही फॉर्मेटसाठी निवडलेली प्लेइंग 11 : वीरेंद्र सेहवा, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबले, जसप्रीत बुमराह, झहीर खान. 12वा खेळाडू: हरभजन सिंग.