मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज टी-20 मालिका (India Vs West Indies) सुरू झाली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना एकतर्फी जिंकून मालिकेला दमदार सुरुवात केली. टीम इंडियाच्या या विजयात दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) सर्वात मोठा हात राहिला. कार्तिकने या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. दिनेश कार्तिकला 7व्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. दिनेश कार्तिकने सामन्यात 215.78 च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली. त्याने 19 चेंडूत 41 धावा केल्या. या सामन्यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. आयपीएल 2022 नंतर कार्तिक टीम इंडियात परतला आहे. तो संघात येताच आता 2 खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणंही अशक्य झालं आहे. इशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
स्टार विकेटकिपर, बॅट्समन इशान किशनला संघात स्थान मिळवता आलेलं नाही. नुकत्याच खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. या मालिकेत दिनेश कार्तिक संघात येताच त्याला पुन्हा एकदा त्याला संघाबाहेर बसावं लागलं. काही काळ इशान किशन सतत संघाचा भाग होता, पण आता त्याला सतत बाहेर बसावं लागत आहे. दिनेश कार्तिकचा हा उत्कृष्ट फॉर्म येत्या सामन्यांमध्ये कायम राहिला तर ईशान किशनच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसन प्लेइंग 11 मध्ये विकेटकिपर, बॅट्समन म्हणून खेळत होता. या मालिकेतही केएल राहुलच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र या मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. यावेळी संजू सॅमसनही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मात्र दिनेश कार्तिकच्या संघात आगमन झाल्यामुळे त्यालाही बाहेर बसावं लागलं आहे. टीम इंडियाला यंदाचा टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे. अशा परिस्थितीत कार्तिकमुळे या दोन खेळाडूंनाही संघातून वगळले जाऊ शकते.