मुंबई : 2008 साली अंडर 19 वर्ल्डकपचा सदस्य असलेल्या विकेटकीपर फलंदाज श्रीवत्स गोस्वामीच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. त्याने गुरुवारी दोन व्हिडीओ फेसबूक पेजवर पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर मॅच फिक्सिंगसारखा गंभीर आरोप केला आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या लीग स्पर्धेत सदर प्रकार घडल्याचं सांगितलं आहे. गोस्वामी याने फेसबुक पेजवर पोस्चट केलेला व्हिडीओ मोहम्मडन स्पोर्टिंग आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्यांचा आहे. श्रीवत्स गोस्वामीने दावा केला आहे की, मोहम्मडन स्पोर्टिंगच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला 7 गुण मिळावे या हेतूने विकेट फेकल्या. पहिल्या व्हिडीओमध्ये उजव्या हाताचा फलंदाज ऑफ स्टंपवर येणार चेंडू सरळ सोडताना दिसत आहे. चेंडू मारण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही आणि यात त्याचा त्रिफळा उडतो. तर दुसऱ्या व्हिडीओत डावखुरा फलंदाज शॉट मारण्याचा प्रयत्न करतो आणि स्टंपिंग होतो. त्यामुळे या विकेट पाहून नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याचं दिसत आहे.
“हा कोलकाता क्लब क्रिकेटमधील सुपर डिव्हिजन सामना आहे. दोन मोठ्या संघात हा सामना होत आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना आहे? माझ्या मनात घर करून असलेला हा खेळ पाहून मला लाज वाटते. मला क्रिकेट आवडते आणि मला बंगालमध्ये खेळायला आवडते पण हे पाहून माझं मन दुखावलं आहे. क्लब क्रिकेट हे बंगाल क्रिकेटचे हृदय आणि आत्मा आहे, कृपया ते खराब करू नका. मला वाटतं याला ‘गॉट अप’ क्रिकेट म्हणतात. मीडिया आता कुठे आहे?” अशी पोस्ट श्रीवत्स गोस्वामी यांनी केली आहे.
सॉल्ट लेकमधील 22 यार्ड्स अकादमीमधील तीन दिवसीय स्पर्धा बुधवारी टाउन क्लबने सात गुणांसह संपन्न झाली. शकीब हबीब गांधीच्या 223 धावांच्या खेळीमुळे टाऊन क्लबला 446 धावांची मजल मारता आली. प्रत्युत्तरात मोहम्मडन स्पोर्टिंगला 281/9 पर्यंत रोखलं. जॉयजीत बसू शतकी खेळीसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. बसू बाद झाल्यानंतर मोहम्मडन स्पोर्टिंगचा डाव कोसळला.