मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटरने रिटायरमेंटचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विकेटकीपर बॅट्समनने निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द एकूण 17 वर्षांची राहिली. पुनित बिष्ट असं या क्रिकेटरचं नाव आहे. पुनितने आयपीएल 2012 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सचंही प्रतिनिधित्व केलं होतं. पुनितने क्रिकेट विश्वात उल्लेखनीय कामगिरी केली, जी कायमच प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात राहिल.
पुनीतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 3 संघांचं प्रतिनिधित्व केलं. पुनीत दिल्ली, जम्मू काश्मिर आणि मेघालय या 3 संघांकडून खेळला. पुनीत 13 जानेवारी 2021 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मेघालयचं प्रतिनिधित्व करत होता. पुनीतने तेव्हा फक्त 51 बॉलमध्ये 6 चौकार आणि 17 सिक्सच्या मदतीने नाबाद 146 धावांची वादळी खेळी केली होती. पुनीत यासह टी 20 क्रिकेटमध्ये एका डावात 17 सिक्स ठोकणारा पहिला भारतीय विकेटकीपर बॅट्समन ठरला. तर पुनीतनंतर ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 18 सिक्स मारण्याचा विक्रम केला होता.
पुनीतने 2006 मध्ये दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. दिल्लीने 2007-2008 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली होती. पुनीत त्या टीमचा सदस्य होता. पुनीतने देशांतर्गत क्रिकेटमधील एकूण 103 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 38 च्या सरासरीने 5 हजार 231 धावा केल्या आहेत. पुनीतने या दरम्यान 10 शतकंही ठोकली आहे. पुनीतचा 343 हा हायस्कोअर आहे.
तसेच पुनीतने विकेटकीपर म्हणून 299 कॅचेस घेतल्या आहेत. तसेच 19 फलंदांजाना स्टपिंग आऊट केलं आहे. तसेच पुनीत 103 लिस्ट ए सामन्यांमध्ये 2 हजार 924 रन्स केल्या आहेत. तर पुनीतच्या नावावर 66 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार 38 धावांची नोंद आहे.
“मला वाटतं की क्रिकेटला अलविदा करण्याची योग्य वेळ आली आहे. मी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए असं मिळन 100 पेक्षा अधिक साामने खळलो आहे. आता खेळाडू म्हणून मिळवण्यासारखं फार काही राहिलं नाही. त्यामुळे निवृ्त्त होण्याची हीच योग्य वेळ आहे”, असं पुनीतन स्पष्ट केलं.