बाबर आझमला शिव्या देऊ नका..! शाहीद आफ्रिदीने दिला पाकिस्तान संघाला सुधारण्यासाठी अजब सल्ला

| Updated on: Jun 15, 2024 | 7:40 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे चोहूबाजूने पाकिस्तानवर टीका होत आहे. बाबर आझमवर आगपाखड केली जात आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी बाबर आझमच्या सपोर्टमध्ये उतरला आहे. तसेच बाबर आझमने नेमकी काय चूक केली ते देखील सांगितलं.

बाबर आझमला शिव्या देऊ नका..! शाहीद आफ्रिदीने दिला पाकिस्तान संघाला सुधारण्यासाठी अजब सल्ला
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानची क्रीडाविश्वात नाचक्की झाली आहे. दुबळ्या आणि नवख्या अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आणि सर्वच चित्र बदलून गेलं. त्यामुळे पाकिस्तानी क्रीडारसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर बाबर आझमच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सर्वच स्तरातून टीकेचा भडीमार होत असताना माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी त्याच्या बाजूने उभा राहिला आहे. शाहीद आफ्रिदीने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, “बाबर आझमविरोधात टीका वगैरे देऊ नका. कर्णधारपद भूषवणं वाटतं तितकं सोपं नाही. आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात.” त्याचबरोबर बाबर आझमने पुन्हा एकदा कर्णधारपद घेणं मोठी चूक होती असं त्याने पुढे सांगितलं. बाबर आझमऐवजी रिझवानला कर्णधारपद देता आलं असतं, असंही सांगितलं.

पाकिस्तानी संघ बाहेर गेल्यापासून आठ-नऊ खेळाडूंना बाहेर काढण्याची मागणी होत आहे. पण असंही काही करणं सोपं नसल्याचंही आफ्रिदीने पुढे सांगितलं. “पाकिस्तानकडे बाबर आझमचा पर्याय आहे का? मोहम्मद रिझवानसारखा दुसरा खेळाडू आहे का?” असे प्रश्न विचारत आफ्रिदीने पीसीबीला नवी पिढी घडवण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची यादीच वाचून दाखवली.

शाहीद आफ्रिदीने सल्ला देत सांगितलं की, ‘देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा सन्मान झाला पाहीजे. सलमान आगा, साउद शकील, साहिबजादा फरहान आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद अलीला टीममध्ये जागा मिळाली पाहीजे.’ शाहीद आफ्रिदीने दिलेला सल्ला पीसीबी मान्य करेल का? हा देखील प्रश्न आहे. दुसरीकडे, पीसीबी पाकिस्तानी खेळाडूंवर नाराज असून पुढच्या काही दिवसात बऱ्याच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. त्यामुळे आता पीसीबी कोणावर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.