Video : “आम्हाला नको शिकवू रिव्हर्स स्विंग..”, रोहित शर्माने झापल्यानंतर इंझमाम उल हकचा पुन्हा हल्लाबोल

| Updated on: Jun 28, 2024 | 6:38 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत टीम इंडियाने एन्ट्री मारली आहे. मात्र यामुळे पाकिस्तानची पोटदुखी काही केल्या कमी होताना दिसत नाही. अर्शदीप सिंगचा बॉल रिव्हर्स स्विंग झाल्यानंतर इंझमाम उल हकने भारतावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. त्याला रोहित शर्माने आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा इंझमाम उल हकने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Video : आम्हाला नको शिकवू रिव्हर्स स्विंग.., रोहित शर्माने झापल्यानंतर इंझमाम उल हकचा पुन्हा हल्लाबोल
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. यामुळे पाकिस्तान संघावर सर्वच बाजूने टीका होत आहे. त्यात भारतीय संघ अंतिम फेरीत गेल्याने पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि टीम इंडियावर टीकास्त्र सोडलं जात आहे. एकीकडे, पाकिस्तान क्रिकेट टीमने आर्मी ट्रेनिंग घेऊनही काही खास केलं नाही. वर्ल्डकपसाठी आर्मीने त्यांना खास ट्रेनिंग दिलं होतं. पण मैदानात आर्मी ट्रेनिंग पितळ उघडं पडलं. आता पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू भारतावर आरोप करण्यात गुंतले आहेत. माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हकने भारतावर बॉल टॅम्परिंग केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्या आरोपांना भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं. “याबाबत आता मी काय बोलू. इतक्या तीव्र उष्णतेत खेळतोय. विकेट ड्राय आहे. अशाच चेंडू ऑटोमॅटिकली रिव्हर्स स्विंग होतोय. हे सर्वच टीमच्या बाबतीत घडतंय. फक्त आमच्याच नाही. त्यामुळे डोकं वापरण्याची गरज आहे. आपण इंग्लंड ऑस्ट्रेलियात नाही खेळत.” रोहित शर्माच्या उत्तरानंतर इंझमाम उल हक चवताळला असून पुन्हा एकदा आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

रोहित शर्माच्या उत्तरानंतर इंझमाम उल हकचा पारा चढला आहे. तसेच रिव्हर्स स्विंगबाबत शिकवू नको, असंही इंझमामने सांगितलं आहे. “आम्ही आमचं डोकं नक्कीच वापरू. पण तू तुझ्या डोक्याचा वापर कर.” असा टोला इंझमाम उल हकने पाकिस्तानी न्यूज चॅनेलवर लगावला. “सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहितने रिव्हर्स स्विंग झाल्याचं मान्य केलं. म्हणजे जे काही पाहिलं ते बरोबर होतं. दुसरं म्हणजे रोहित शर्माने रिव्हर्स स्विंग कसा होतो हे आम्हाला शिकवू नये. किती उष्णतेत होतो. जे आम्ही जगाला शिकवतो, त्याना या गोष्टी सांगू नये.”, असं इंझमाम उल हक म्हणाला.

“मी बॉल टॅम्परिंग केलं असं नाही म्हणालो. पत्रकाराने चुकीचा प्रश्न विचारला. मी पंचांना सल्ला दिला होता. डोळे उघडे ठेवा. कारण 15व्या षटकात चेंडू रिव्हर्स स्विंग झाला. आताही पंचांना माझा हाच सल्ला आहे.त्याने फक्त डोकं वापरण्याचा सल्ला दिला. मी डोकं आणि डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.”, इंझमाम उल हकने सांगितलं.