श्रीलंकेत क्रिकेटवरून जोरदार ड्रामा, क्रीडामंत्र्यांनी तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाला केराची टोपली

| Updated on: Nov 07, 2023 | 3:49 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यात श्रीलंकन संघ आणि क्रिकेट बोर्डाचं काही खरं दिसत नाही. श्रीलंकेची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. तसेच स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलं आहे.त्यामुळे क्रिकेट बोर्ड क्रीडामंत्र्यांनी बरखास्त केलं होतं. पण आता बोर्डाला पुन्हा दिलासा मिळाला आहे.

श्रीलंकेत क्रिकेटवरून जोरदार ड्रामा, क्रीडामंत्र्यांनी तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाला केराची टोपली
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाबाबत घेतलेला तो निर्णय गुंडाळला, क्रीडामंत्र्यांना चपराक
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेला भारताकडून मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी क्रिकेट बोर्ड बर्खास्त करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर क्रिकेट बोर्डाने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांची याचिका स्वीकारली. या याचिकेत श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त आणि अंतरिम समिती नियुक्त करण्याचा मंत्री रोशन रणसिंघे यांच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. कोर्टाने क्रीडामंत्र्यांनी घेतलेला निर्णय बरखास्त केला आहे. तसेच पूर्ण सुनावणी होईपर्यंत निष्काषित अधिकाऱ्यांना पुन्हा पदं बहाल केली आहेत.

कोर्टातील एका अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘बोर्डाला दोन आठवड्यांसाठी संमती दिली आहे. त्यानंतर कोर्ट पुन्हा एकदा सुनावणी करणार आहे.’ माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखालीली अंतरिम समितीला सिल्वा यांना रोखण्याचे आदेश मिळाले होते. बोर्डाच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती.

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि क्रीडामंत्र्यांमध्ये वाद सुरु आहे. क्रीडामंत्री रणसिंघे यांनी क्रिकेट बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर सात सदस्यीय समिती स्थापन केली होती. यात सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीस आणि बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा समावेश होता. सचिव महोन डीसिल्वा यांनी राजीनामा दिल्यानंतर समिती स्थापित केली होती.

रणसिंघे यांनी सांगितलं होतं की, ‘बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता.’ इतकंच नाही तर त्यांनी बोर्डावर देशद्रोही आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. रणसिंघे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याबाबत आयसीसीला पत्र लिहून पाठिंब्याची मागणी केली आहे. पण आयसीसीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मागच्या आठवड्यात भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत केलं होतं. भारताने श्रीलंकेसमोर 358 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण संपूर्ण संघ 55 धावांवर बाद झाला. विश्वचषक इतिहासातील श्रीलंकेचा चौथा सर्वात कमी स्कोअर आहे. अशा पराभवानंतर श्रीलंकेत संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. इतकंच काय तर लोकांच्या उद्रेक पाहून कोलंबोत बोर्डाच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.