दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया बी आणि इंडिया सी या दोन संघांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे. इंडिया बी संघाने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील संघाने दोन दिवस खऱ्या अर्थाने गाजवले. 10 विकेट गमवून 525 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात इशान किशनने दमदार शतक ठोकलं. तर ऋतुराज गायकवाड, बाबा इंद्रजीथ आणि मानव सुथारने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे हा सामना इंडिया सीच्या पारडयात झुकलेला पाहायला मिळाला. पण इंडिया बी संघानेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एकही विकेट गमावली नाही. अभिमन्यू ईश्वरन आणि एन जगदीसन यांनी शतकी भागीदारी केली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी मिळून 124 धावा ठोकल्या. यात अभिमन्यू ईश्वरने 91 चेंडूत 51 धावा, तर एन जगदीशन याने 126 चेंडूत 67 धावांची खेळी केली. अजूनही इंडिया सी संघाकडे 401 धावांची आघाडी आहे. आता तिसऱ्या दिवशी इंडिया बी संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे, इंडिया ए संघाने श्रेयस अय्यरच्या इंडिया डी संघाची हवा काढली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय फसल्याचं दिसून आलं. इंडिया ए संघाने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारली. तर या धावांचा पाठलाग करताना इंडिया डी संघ गडगडला. त्याला 183 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे इंडिया ए संघाला 107 धावांची आघाडी मिळाली. इंडिया ए संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 1 बाद 115 धावा केल्या आहे. तसेच 107 धावांची आघाडी मिळून 222 धावा झाल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा प्रथम सिंग नाबाद 59 धावांवर खेळत आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकूण 4 संघ असून बाद फेरीचे सामने होणार नाहीत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 3 सामने खेळणार आहे. यात गुणतालिकेत अव्वल असलेला संघ विजयी घोषित केला जाईल. एक डावाने विजयी झालेल्या संघाला 7 गुण, चार डाव खेळत विजय मिळवला तर 6 गुण मिळतील. दुसरीकडे, सामना ड्रॉ झाला तर पहिल्या डावात आघाडी असलेल्या संघाला 3 गुण आणि पिछाडीवर असलेल्या संघाला 1 गुण मिळणार आहे. सध्या इंडिया बी आणि इंडिया सी संघाकडे प्रत्येकी 6 गुण आहेत.