देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दिग्गज खेळाडू खेळत असल्याने महत्त्व वाढलं आहे. बीसीसीआने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची ताकीद दिली होती. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधनही वाढवलं आहे. असं असताना दुलीप ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना सुरु आहे. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वातील इंडिया ए संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडिया बी संघाची स्थिती पहिल्या दोन सत्रात नाजूक होती. एका पाठोपाठ एक करत सात खेळाडू तंबूत परतले होते. अवघ्या 97 धावांवर सात गडी तंबूत अशी स्थिती होती. पण मुशीर खानने एका बाजूने लढा सुरुच ठेवला. त्याला नवदीप सैनीची साथ लाभली. दोघांनी मिळून आठव्या गड्यासाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. इतकंच काय तर मुशीर खाने शतक ठोकलं आणि संघाला चांगल्या स्थितीत आणलं.
मुशीर खानने 205 चेंडूंचा सामना करत 48.78 च्या स्ट्राईक रेटने 100 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याने शतकी खेळी करताच संघात असलेल्या त्याचा भाऊ सरफराज खानने त्याचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. मुशीर खान हा कसोटी क्रिकेटसाठी एक चांगला फलंदाज असल्याचं अधोरेखित होत आहे. मुशीर खानने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीतही शतक ठोकलं होतं. मुशीर खान पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळत असून शतक ठोकलं आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील हा सामना संपला की बांग्लादेश कसोटीसाठी संघाची घोषणा होणार आहे. मुशीर खानने शतक ठोकून आपला दावा ठोकला आहे. पण त्याचा अनुभव पाहता त्याची निवड कसोटी संघात होईल की नाही? याबाबत शंका आहे. कारण बांग्लादेश कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेवर भारताचं अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. दुसरीकडे, बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत आधीच इशारा दिला आहे. त्यामुळे संघात कोणाची निवड होते आणि कोणाला डावललं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.