श्रेयस अय्यरला अजूनही फॉर्म गवसत नसल्याचं दिसत आहे. देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही धावांसाठी झुंजताना दिसला. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला डावलण्यात आलं. दुलीप ट्रॉफीत त्याच्याकडे इंडिया डी संघाची धुरा आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 9, तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. पण विजय काही मिळवता आला नव्हता. तर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण या सामन्यातही श्रेयस अय्यर फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. शून्यावर आऊट झाला याचं काही देणं घेणं नाही. पण श्रेयस अय्यर ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच काय तर नेटकरी प्रतिक्रिया देताना वाटेल ते बोलत आहेत. कारण काळा चष्मा घालून श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला होता. पण त्याचा खेळ 7 चेंडूतच संपला. खलील अहमदने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आकिब खानने त्याचा झेल पकडला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
श्रेयस अय्यर काळा चष्मा घालून बॅटिंगला आल्याचं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही चाहत्यांनी त्याचं समर्थन केलं आहे. फलंदाजी करताना सूर्यप्रकाश थेट डोळ्यावर येत असल्याने काळा चष्मा घातला होता, असं काही जणांचं म्हणणं आहे. पण असं करूनही शून्यावर बाद झाल्याने ट्रोल होत आहे. श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इंडिया ए संघाने सर्वबाद 290 धावा केल्या. या धावांचा पाठला करताना इंडिया डी संघाचा डाव गडगडला. 170 धावांवरच निम्म्याहून अधिक संघ तंबूत गेला होता.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) September 13, 2024
श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. विशाखापट्टणम कसोटीनंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. अय्यरने आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात एक शतक आणि 5 अर्धशतकं केली असून एकूण 811 धावा आहेत. सध्याचा अय्यरचा फॉर्म पाहता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमबॅक करणं कठीण आहे. जर स्थान मिळवायचं असेल, तर चांगली कामगिरी करावी लागेल.