मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार असून आता 30 दिवसांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. एकूण दहा संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. पहिलाचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच हार्दिक पांड्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्या यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. पण 2022 आयपीएल स्पर्धेत त्याच्याकडे गुजरात टायटन्सचं कर्णधारपद आलं आणि तो सलग दोन वर्षे तेथून खेळला. पण ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेत थेट कर्णधारपद दिलं. त्यानंतर बराच वादंग झाला. रोहित शर्माच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सवर आगपाखड केली. रोहित शर्मा विरुद्ध हार्दिक पांड्या असं एक चित्र उभं केलं आहे. पण आता दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत. कारण ट्रेड विंडो बंद झाली असून आता खेळाडूंची खरेदी विक्री करता येणार नाही. असं सर्व काही घडत असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्याला आपला राग अनावर झाला. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांवर आगपाखड केली.
हार्दिक पांड्या आयपीएलसाठी एक शूट करत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितलं आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पांड्या सुरुवातीला शांत होता. पण डेक्सवर नाश्ता पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जलेबी, फाफडा पाहून त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. “हे काय आहे. मी जलेबी कसं खाणार..काय ढोकला..हे सर्व काय आहे..भाई फिटनेस करायचं असतं. हे कसं खाणार मी..कोणी पाठवलं हे..” असं हार्दिक पांड्या म्हणत असताना कर्मचारी त्याला एडजस्ट करण्याची विनंती करतो. “अरे भाई एडजस्ट नाही होत. शेफ आणि न्यूट्रिशियन्स कुठे आहेत. ” असा रुद्रावतार हार्दिक पांड्याने घेतला.
No cheat meals for Hardik Pandya in this leaked clip from the Star Sports IPL film shoot. pic.twitter.com/7Td02ecl8m
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 23, 2024
कर्मचारी हार्दिक पांड्याला म्हणाला की, शेफला लेट झालं. आजचा दिवस खा..जलेबी खा आणि पात्राही आहे. त्यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, “भाऊ, कसं खाणार हे. डायरेक्टर साहेबांना सांगा हे नाही चालणार. हे खाऊन माझा स्टॅमिना बिघडून जाईल. ” हार्दिक पांड्याची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता ही क्लिप त्या जाहिरातीचा भाग आहे की नाही अद्याप अस्पष्ट आहे. पण व्हायरल क्लिप पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
हार्दिक पांड्याला वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्याकडे सध्या मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद आहे. वारंवार दुखापग्रस्त होत असल्याचं हार्दिक पांड्याकडे टी20 वर्ल्डकपचं नेतृत्व सोपवणं कठीण असल्याचं मत तयार झालं आहे. त्यामुळे आता टी20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद भूषविणार आहे.