मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एक दोन नाही तर तिसऱ्यांदा मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला पहिल्यांदाच वनडे सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला प्रमुख दावेदार मानलं जात होतं. मात्र आता उपांत्य फेरीची वाट खूपच बिकट झाली आहे. सलग तीन पराभवामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झाले आहे. पाकिस्तानची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात खराब प्रदर्शन आहे. पाकिस्तानची अशी हाराकिरी पाहून माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम चांगलाच भडकला आहे. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना चांगलंच धारेवर धरलं आहे. क्षेत्ररक्षणावरून त्याने खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत.
वसीम अक्रम म्हणाला की, “असा पराभव खूपच वाईट आहे. फक्त दोन गडी बाद होत 280 धावा गाठणं मोठी बाब आहे. खेळपट्टी कशीही असो, फिल्डिंग आणि फिटनेसकडे पाहा. मी मागच्या तीन आठवड्यापासून जोरजोरात ओरडून सांगतोय. या खेळाडूंनी मागच्या दोन वर्षात फिटनेट टेस्ट दिली नाही. मी जर त्यांची नावं घ्यायला लागलो तर त्यांचे चेहरे उतरतील. असं वाटते की रोज 8 किलो मटण खात आहेत. फिटनेस टेस्ट करायची नाही का?”
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने विजयी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं. त्यानंतर श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजलं. मात्र त्यानंतर उतरती कला लागली. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने पराभूत केलं. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. चार गुणांसह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. आता पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. तसेच इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल.
पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 50 षटकात 7 गडी गमवून 282 धावा केल्या आणि विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अफगाणिस्तानने 2 गडी गमवून पूर्ण केलं. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर 8 गडी आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला.