मुंबई | इंग्लंड क्रिकेट टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 291 धावा केल्या. इंग्लंडकडून कॅप्टन जॉस बटलर याच्यासह एकूण चौघांनी अर्धशतकी खेळी केली. जॉस बटलर याने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर लियाम लिविंगस्टोन आणि बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलान या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडकडून बटलर याने 68 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. स्टोक्स आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 52 धावा जोडल्या. डेव्हिड मलान याने 54 रन्सचं योगदान दिलं. तर हॅरी ब्रूक 25 धावांवर माघारी परतला. जो रुटने 6 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर अखेरीस डेव्हिड विली याने नाबाद 21 आणि ख्रिस वोक्स याने नाबाद 4 धावा केल्या
न्यूझीलंकडून रचीन रविंद्र याने 10 ओव्हरमध्ये 48 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. टीम साऊथी महागडा ठरला. साऊथीने 10 ओव्हरमध्ये 71 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसन याच्या खात्यात 1 विकेट गेली.
बेन स्टोक्स याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र वर्ल्ड कप 2023 साठी बेन स्टोक्स हा निर्णय मागे घेतला. आता वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून स्टोक्सने वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. तसेच वर्षभराच्या अंतरानंतर त्याने अर्धशतक ठोकत आपण वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय. वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातच होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या मालिकेचा वर्ल्ड कपआधी चांगलाच फायदा होणार आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेविड मलान, हॅरी ब्रूक, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद आणि रीस टोपली.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टीम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन.