इंग्लंड पाकिस्तान यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 2-0 ने खिशात घातली आणि व्हाईटवॉश दिला. दोन सामने पावसामुळे रद्द झाले तर दोन सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. आत्मविश्वास कमी झाल्याने पाकिस्तानचं टी20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगू शकतं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 3 गडी गमवून 15.3 षटकात पूर्ण केलं. इंग्लंडने पाकिस्तानेवर 7 गडी आणि 27 चेंडू राखून विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपलं मत व्यक्त केलं आहे. पराभवानंतरही वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करू असं त्याने सांगितलं आहे. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये 6 जूनला अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे.
“पहिली सहा षटके आम्ही चांगली खेळली. त्यानंतर विकेट पडल्याने धावांचा वेग मंदावला. आमच्या मधल्या फळीला पुढे जाण्याची गरज होती. तुम्हाला मधल्या आणि डेथ ओव्हरमध्ये 2-3 चांगल्या ओव्हर्सची गरज होती. इंग्लंडची गोलंदाजी खूपच चांगली होती. आशा आहे की आम्ही विश्वचषकात असे करणार नाही. दुखापतींमुळे आम्ही काही बदल केले होते. आमचा पॉवरप्ले चांगला होता. आम्ही पॅचेसमध्ये चांगले क्रिकेट खेळलो आहे.”, असं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितलं. पाकिस्तानने शेवटचा टी20 वर्ल्डकप 2009 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.