श्रीलंका क्रिकेट टीम इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेला इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला दुसऱ्या डावात 156 धावांवर गुंडाळलं. लहीरु कुमारा याने 21 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. तर विश्वा फर्नांडो याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. असिथा फर्नांडो याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मिलन रथनायके याच्या खात्यात 1 विकेट गेली. इंग्लंडला झटपट रोखल्याने श्रीलंकेला विजयासाठी 219 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 95 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी आणखी 125 धावांची गरज आहे, तर हातात 9 विकेट्स आहेत.
श्रीलंकेकडून पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस ही जोडी चौथ्या दिवसाच्या बॅटिंगला सुरुवात करणार आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाथुम 53 आणि कुसल मेंडीस 30 धावांवर नाबद परतले होते. तर दिमुथ करुणारत्ने याच्या रुपात श्रीलंकेने एकमेव विकेट गमावली. ख्रिस वोक्स याने दिमुथ याला 8 धावांवर बाद केलं. इंग्लंडने ही मालिका आधीच जिंकली आहे. इंग्लंड 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि कामिंदु मेंडीस या जोडीने 5 बाद 211 धावांपासून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र ही जोडी झटपट आऊट झाली. त्यानंतर इतर कुणालाही काही खास करता आलं नाही. श्रीलंकने 43 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव हा इंग्लंडच्या 325 च्या प्रत्युतरात 263 वर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला 62 धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धमाका केला. गोलंदाजांनी परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जॅमी स्मिथ 67 आणि डॅन लॉरेन्स याने 35 धावा केल्या. दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फार कुणालाच टिकून दिलं नाही. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव हा 34 ओव्हरमध्ये 156 धावांवर आटोपला.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.