पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता झाली आहे. भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदकं मिळवली. आता त्यानंतर पुन्हा एकदा क्रीडा चाहत्यांचं लक्ष हे क्रिकेट सामन्यांकडे आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची मालिका होणार आहे.या मालिकेसाठी श्रीलंका इंग्लंडमध्ये पोहचली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेआधीच इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा कॅप्टन आणि अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स याला दुखापत झाली आहे. बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड स्पर्धेत हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यामुळे स्टोक्सला मैदान सोडावं लागलं.
रविवारी द हन्ड्रेड स्पर्धेत ओल्ड ट्रॅफर्ड येथे नॉर्दर्न सुपरचार्जर्स विरुद्ध मॅनचेस्ट ओरिजिनल्स आमनेसामने होते. नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून बॅटिंग करताना स्टोक्सला त्रास जाणवला. स्टोक्सला एकेरी धाव घेताना संघर्ष करावा लागला. स्टोक्सला इतका त्रास जाणवला की त्याला स्ट्रेचरने मैदानाबाहेर नेण्यात आलं. स्टोक्सच्या दुखापतीवर वैद्यकीय पथक करडी नजर ठेवून आहेत. तसेच सोमवारी स्टोक्सच्या दुखापतीबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर सुपरचार्जसचा कॅप्टन हॅरी ब्रूक याने स्टोक्सच्या दुखापतीबाबत माहिती दिली. स्टोक्सची स्थिती फार चांगली नाही, असं ब्रूकने सांगितलं.
दरम्यान आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, स्टोक्सला झालेली दुखापत गंभीर असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्टोक्सला श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला मुकावं लागण्याची शक्यता आहे. स्टोक्सला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागल्यास, इंग्लंडसाठी तो मोठा धक्का असेल.
पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.
दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.
तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम: बेन स्टोक्स (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, ओली पोप (उपकर्णधार), जो रूट, जॉर्डन कॉक्स, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मार्क वुड, शोएब बशीर, ओली स्टोन आणि मॅट पॉट्स.
टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थारका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि मिलन रथनायके.