Alex Hales Retirement | इंग्लंड क्रिकेटर एलेक्स हेल्स याचा क्रिकेटला अलविदा

| Updated on: Aug 04, 2023 | 6:12 PM

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेआधी स्टार ओपनर बॅट्समनने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

Alex Hales Retirement | इंग्लंड क्रिकेटर एलेक्स हेल्स याचा क्रिकेटला अलविदा
Follow us on

मुंबई | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट टीमचा स्टार ओपनर बॅट्समन एलेक्स हेल्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हेल्सने इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंड टीम गेल्या वर्षी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 जिंकली होती. इंग्लंडने तेव्हा टी 20 वर्ल्ड कप अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूतं केलं होतं. हेल्स या वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता.

एलेक्स हेल्स याची इंस्टाग्राम पोस्ट


“मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय, याची नोंद घ्यावी. टेस्ट, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमधील एकूण 156 सामन्यात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. या दरम्यान असंख्य आठवणी सोबत आहेत. आता पुढे जाण्याची ही योग्य वेळ आहे”, असं हेल्सने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

“वर्ल्ड कप अंतिम सामना हा माझ्यासाठी अखेरचा सामना ठरला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. इंग्लंडसाठी खेळताना कारकीर्दीत अनेक चढउतार आले. हा एक अविश्वसनीय असा प्रवास राहिला. मला या चढउतारात माझ्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी, कुटुंबियांची आणि समर्थकांची साथ मिळाली. या सर्वांनीच मला पाठिंबा दिला.”, अशा शब्दात हेल्सने सहकारी, कुटुंबियांसह मित्रांचेही आभार मानले.

एलेक्स हेल्स याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

हेल्सने ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. हेल्सने टीम इंडिया विरुद्ध सेमी फायनलमध्ये 47 बॉलमध्ये 86 धावांची नाबाद खेळी केली होती. हेल्सची ही खेळी निर्णायक ठरली होती. त्यामुळेच टीम इंडियाला 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.

एलेक्स हेल्स याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

एलेक्स हेल्स याने इंग्लंडचं 11 कसोटी, 70 वनडे आणि 75 टी 20 अशा एकूण 156 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. एलेक्सने 573 कसोटी, 2 हजार 419 वनडे आणि 2 हजार 74 टी 20 अशा एकूण 5 हजार 66 धावा केल्या. एलेक्सने एकूण 578 चौकार आणि 123 सिक्स खेचले.