इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्राहम थोर्प यांचं 5 ऑगस्टला दुर्दैवी निधन झालं. 1 ऑगस्टला त्यांनी वयाचं 55वं वर्ष गाठलं होतं. त्यानंतर चार दिवसातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या अशा अकाली निधनाने क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती. अनेकांना या मृत्यूचं नेमकं कारण काय? हे कळलं नाही. तसेच त्यांच्या निधनाच्या बातमीने चर्चांना उधाणही आलं होत. कारण त्यांचा मृत्यू हा काही नैसर्गिक नव्हता, त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. इंग्लंडसाठी 100 कसोटी सामने खेळणाऱ्या ग्राहम थोर्पवर अशी वेळ येण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न पडत होते. आता त्यांच्या मृत्यूच्या सात दिवसानंतर पत्नीने मोठा खुलासा केला आहे. ग्राहम गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचं पत्नीने सांगितलं आहे. ग्राहमने यापूर्वी मे 2022 मध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि घरी परतले.
ग्राहम थोर्प यांची पत्नी अमांडा यांनी सांगितलं की, ‘गेल्या काही वर्षांपासून ग्राहम नैराश्य आणि चिंताग्रस्त होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून आजार बळावला होता. आम्ही त्यांच्याशिवाय राहू शकतो असं त्यांना वाटत होतं. त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि जीवनयात्रा संपवली. आम्ही त्यांच्या अशा निर्णयाने खूपच दु:खी आहोत. आम्ही एक कुटुंब म्हणून कायमच त्यांच्या पाठीशी राहिलो. तसेच त्यांच्यावर विविध उपचारही केले. पण दुर्दैवाने एकही उपचार कामी आला नाही.’
ग्राहम थोर्प यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात 1993 साली केली होती. त्यांनी इंग्लंडसाठी 100 कसोटी सामने खेळले. यात त्याने 16 शतकं आणि 39 अर्धशतकांच्या मदतीने 6744 धावा केल्या. तसेच 82 वनडे सामन्यात 21 अर्धशतकांच्या जोरावर 2380 धावा केल्या. इंग्लिश काउंटीत त्याने 341 फर्स्ट क्लास सामने खेळले आणि 49 शतकांच्या जोरावर 21937 धावा केल्या. तसेच लिस्ट एमध्ये 10871 धावा केल्या. यात त्यांनी 9 शतकं ठोकली. ग्राहम यांनी 2005 पासून प्रशिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली. 2013 च्या सुरुवातीला थोर्प इंग्लंडच्या वनडे, टी20 संघाचे बॅटिंग कोच होते. तसेच 2020 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी त्यांच्या अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदार दिली होती. 2022 मध्ये अफगाणिस्तानच्या हेड कोचपदी विराजमान झाले. पण तेव्हाच त्यांना गंभीर आजाराने ग्रासलं आणि नैराश्यात गेले.