‘जशी करणी तशी भरणी’ या म्हणीप्रमाणे पाकिस्तानला फटका बसला. दुसऱ्यांना खड्ड्यात टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वत:च पडल्याचं पहिल्या कसोटीवरून दिसत आहे. इंग्लंडचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना मुल्तानमध्ये होत आहे. यासाठी पाकिस्तानकडून पाटा विकेट बनवली गेली आहे. या विकेटवर गोलंदाजांचा चांगलाच घाम निघताना दिसत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाटा विकेटवर पाकिस्तानच्या फलंदाजांनी सर्वबाद 556 धावा केल्या. मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी तोडीस तोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानला त्यांच्या भूमीत अद्दल घडवली आहे. खासकरून जो रूट आणि हॅरी ब्रूकने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली. दोघांनी मिळून 452 धावांची भागीदारी केली. जो रूटने 262 धावा करून बाद झाला. त्यानंतर हॅरी ब्रूकचा झंझावात अनुभवायला मिळाला. हॅरी ब्रूकने 310 चेंडूत 28 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 97.42 च्या स्ट्राईक रेटने 302 धावा केल्या. चौकार मारत हॅरी ब्रूकने आपलं त्रिशतक साजरं केलं आहे.
हॅरी ब्रूक त्रिशतक ठोकणारा इंग्लंडचा सहावा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडकडून 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लिनॉर्ड हटनने 364 धावा केल्या होत्या. वॅली हमाँडने 1933 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडमध्ये नाबाद 336 धावा केल्या होत्या. ग्रॅहम गूचने 1990 मध्ये भारताविरुद्ध 333 धावा केल्या होत्या. अँडी सँडहमने वेस्ट इंडिजविरुद्ध 1930 मध्ये 325 धावा केल्या होत्या. जॉन एडरिचने 1965 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 310 धावांची खेळी केली होती. तर हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक ठोकलं आहे. दरम्यान, पाकिस्तानने दिलेल्या 556 धावांचा पल्ला इंग्लंडने कधीच गाठला आहे. तसेच 750 पार धावसंख्या नेली आहे. त्यामुळे हा सामना एक तर ड्रॉ होईल किंवा इंग्लंड जिंकेल अशी स्थिती आहे.
वेगाने त्रिशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हॅरी ब्रूक आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर विरेंद्र सेहवाग असून त्याने 278 चेंडूत ही किमया साधली होती. तर हॅरी ब्रूकने त्रिशतकासाठी 310 चेंडूंचा सामना केला. मॅथ्यू हेडनने त्रिशतकासाठी 362 चेंडू खेळले होते. तर विरेंद्र सेहवाग पुन्हा या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्रिशतकासाठी 364 चेंडूंचा सामना केला होता.