मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. यासह स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरु केली आहे. भारताने अफगाणिस्तानला 15 षटकं आणि 8 गडी राखून पराभूत केलं. यावेळी रोहित शर्मा याच्या आक्रमक शतकी खेळीमुळे उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. पण सामन्याच्या सुरुवातीला स्टेडियममध्ये काही खुर्च्या रिकामी असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अवघ्या 8 शब्दात मायकल वॉन याची बोलती बंद केली आहे. ट्विटरवर नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
सामना सुरु होण्याच्या आधी मायकल वॉन याने ट्वीट करत लिहिलं की, ‘दिल्लीत भारताच्या सामन्यासाठी रिकाम्या खुर्च्या का?’ यावर हरभजन सिंग याने आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. तसेच मायकल वॉन याची बोलती बंद केली आहे. “तू सामना पाहात आहेस की रिकामी खुर्च्या.” यावर मायकल वॉनचं कोणतंच उत्तर आलं नाही. दुसरीकडे, संध्याकाळ होता होता मैदान पूर्णपणे भरलं. वॉनच्या ट्वीटखाली एका फॅन्सने व्हिडीओ शेअर केला आहे. यात मैदानात भरल्याचं दिसत आहे.
Are u watching the game or empty seats ?? https://t.co/4e1wgfAckn
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 11, 2023
अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 35 षटकात पूर्ण केलं. यामुळे भारताच्या नेट रनरेटमध्ये जबरदस्त फरक पडला आणि थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. भारताचा पुढचा सामना आता पाकिस्तानसोबत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत. यात सात पैकी सात सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे आठव्या सामन्यातही भारताचं पारडं जड आहे. दुसरीकडे दोन्ही संघांनी स्पर्धेत सलग दोन सामने जिंकले आहेत. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू असतील याबाबत उत्सुकता आहे.
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.