पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर आता वेध लागले आहेत ते चार वर्षांनी होणाऱ्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेचे..या स्पर्धेबाबत आतापासून उत्सुकता आहे. कारण तमाम भारतीयांचा आवडता क्रिकेट हा खेळ या स्पर्धेत असणार आहे. त्यामुळे भारताचं एक मेडल निश्चित अशीच भावना क्रीडारसिकांच्या मनात आतापासूनच घर करून आहे. पण या स्पर्धेत आयसीसी फक्त सहा संघांना परवानगी देणार असल्याची चर्चा आहे. पण ही संख्या ऑलिम्पिक स्पर्धा जवळ येईपर्यंत वाढली तर आश्चर्य वाटायला नको. सद्यस्थिती पाहता सहा संघात इंग्लंड-स्कॉटलँड एक संघ म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे. कारण इंग्लंड आणि स्कॉटलँड हे देश ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन या नावाने सहभागी होतात. आता क्रिकेट स्पर्धेतही या दोन्ही देशांना विलिनीकरण करावं लागू शकतं.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आधीच जाहीर केलं आहे की, जर इंग्लंडचा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला तर ग्रेट ब्रिटनच्या नावाने खेळेल. दुसरीकडे, स्कॉटलँडचे खेळाडूही इंग्लंड संघाशी हातमिळवणी करण्यास उत्सुक आहेत. पुरुष संघच नाही तर महिला क्रिकेटमध्येही असंच होऊ शकतं. या प्रकरणावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट स्कॉटलंड यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे. फक्त खेळाडूच नाही तर सपोर्ट स्टाफची निवड करताना दमछाक होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी ईएसपीएनक्रिनइनफोला माहिती देताना सांगितलं की, ‘लॉस अँजेलिस ऑलिम्पिक स्पर्धा अजून चार वर्षे दूर आहे. पण आम्ही आतापासून याबाबत चर्चा सुरु केली आहे. पुढील निती ठरवण्यासाठी आम्ही क्रिकेट स्कॉटलँडशी बोलत आहोत.’
2028 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंडचे संघ ग्रेट ब्रिटनच्या नावाखाली एकत्र स्पर्धा करतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दुसरीकडे, इंग्लंड आणि स्कॉटलँडचे संबंध आणखी दृढ झाले तर त्याचा फायदा आयसीसी चषक स्पर्धेत होईल. 2026 महिला आणि 2030 पुरुष टी20 वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार आहे. 2028 मध्ये न्यूझीलंड ऑस्ट्रेलियात होईल.