मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) राजस्थान रॉयल्सकडून (RR) 7 गडी राखून पराभव झाला. यामुळे पुन्हा एकदा आरसीबीचे खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या विजेतेपदाचे स्वप्न भंगलंय. मात्र, पराभव होऊनही या संघावर कोट्यवधींचा पाऊस पडला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल हंगामासाठी आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा होतील. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर पराभूत संघाला 13 कोटी रुपये मिळतील.
याशिवाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. दुसरीकडे, उदयोन्मुख खेळाडूला 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्याच वेळी लीग टप्प्यात बाहेर पडलेल्या संघांना किती रक्कम मिळेल याबद्दल कोणतीही माहिती नाही.
आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला त्यादरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले. त्यावेळी आरआरला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही लीग जसजशी जगभर लोकप्रिय होत गेली तसतशी बक्षिसांची रक्कमही वाढत गेली. आजघडीला जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळते.
पंधरा वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. तर दुसरीकडे दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलला नवा चॅम्पियन देण्याची संधी आहे. आज दोन शेजारील राज्यांचे संघ इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरतील. राजस्थान एकदा चॅम्पियन राहिलाय. मात्र, याला अनेक वर्ष झाले आहेत. तर गुजरात मात्र नवा संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे. तर
आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरेल. आयपीएलचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आसल्यानं हे देखील त्यातल्या त्यात विशेष आहे.