“धोनी पण मदत करू शकत नाही..”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने काढली आठवण

| Updated on: May 06, 2024 | 5:36 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्स आता आत्मसन्मानासाठी उर्वरित तीन सामन्यात खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा सामना हैदराबादविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने आपल्या मनातलं बोलून दाखवलं.

धोनी पण मदत करू शकत नाही.., हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने काढली आठवण
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व फ्रेंचायसीने विचारपूर्वक सोपवलं आहे. भविष्याचा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवूनच मुंबई इंडियन्सने ही डील केली होती. गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिकला संघात घेऊन कॅप्टनशी दिली. मात्र यंदाच्या पर्वात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात काही खास होऊ शकलं नाही. मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे तीन सामन्यांची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामना वानखेडे स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने स्टार स्पोर्टशी बोलताना मन मोकळं केलं. खासकरून महेंद्रसिंह धोनी याचा उल्लेख केला. तसेच चुकांमधून शिकून पुढे जाता येतं असा सांगण्यासही विसरला नाही. हार्दिक पांड्याने सांगितलं की, “चुकांमधून शिकणं एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. इथे तुम्ही जे काही शिकता ते तुम्हाला तुमचा जवळचा व्यक्तीही शिकवू शकत नाही. आपले आदर्शही आपल्याला या बाबतीत काहीच मदत करू शकत नाही.”

“काही अंशी बोलायचं झालं तर माही भाईदेखील या प्रकरणात मदत करू शकत नाही. मी कायम एक असा व्यक्ती राहिलो की, जो जबाबदारी घेतो. मला असं वाटतं की जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा ती वस्तू आपली होते. चुकांसोबतही माझं असंच काहीसं आहे. मी कायम चुकांमधून शिकत आलो आहे.”, असं हार्दिक पांड्या याने सांगितलं. मुंबई इंडियन्सचं या पर्वात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. पाचवेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबईने फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्याही काही खास करू शकलेला नाही. त्याने 11 सामन्यात फक्त 198 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत 8 विकेट घेतल्या आहेत. इतका खराब फॉर्म असताना त्याच्याकडे टी20 वर्ल्डकपची धुरा सोपवली आहे.

स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार आहे. पहिल्या सामन्यात हैदराबादने पराभूत केलं होतं. आता हैदराबादला पराभूत करून प्लेऑफची वाट अडवण्याची संधी आहे. तसेच सामना जिंकून आत्मसन्मान ठेवता येणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपाही काढता येणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय, ल्यूक वुड, श्रेयस गोपाल, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, क्वेना मफाका.